शारजा – महिलांच्या आयपीएल स्पर्धेत आज वेलॉसीटीचा सामना ट्रायलब्लेझर्सशी होणार आहे. या सामन्यात ट्रायलब्लेझर्सची कर्णधार स्मृती मानधना व वेलॉसीटीची कर्णधार मिताली राज यांच्या नेतृत्वाचीही स्पर्धा रंगणार आहे.
मितालीने गेली अनेक वर्षे भारताच्या महिला संघाचे नेतृत्व केले असल्याने तिला अनुभव आहे. मात्र, मानधना प्रथमच एका मोठ्या स्पर्धेत नेतृत्व करत आहे. दोन्ही संघांचे बलाबल पाहिले तर मितालीचा संघ भक्कम वाटतो. तिच्या संघात वेदा कृष्णमूर्ती, शेफाली वर्मा, सुषमा वर्मा, एकता बिश्त, शिखा पांडे अशा अव्वल खेळाडू आहेत. त्यांनी गेल्या काही मोसमांत भारताच्या महिला संघाकडून देशात तसेच परदेशातही सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे.
या उलट मानधनाच्या संघात दीप्ती शर्मा, पूनम राऊत, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी यांचा समावेश असून मानधनासह याच खेळाडूंना संघाचा मुख्य भार वाहावा लागणार आहे. नाथाकान चंथाम या थायलंडच्या खेळाडूचा समावेश असून तीने आपल्या खेळाने आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही वर्चस्व राखले आहे. तिच्याकडून मानधनाला अशाच सरस खेळाची अपेक्षा राहणार आहे.
स्वतः मानधना अफलातून फलंदाज असली तरीही करोनाच्या काळामुळे सर्व खेळाडूंना स्पर्धांचा तसेच सरावाचाही अनुभव मिळालेला नाही. तसेच या स्पर्धेतील तीनही संघांचे खेळाडू काही दिवसांपूर्वीच अमिरातीत दाखल झाले होते व त्यामुळे त्यांना बायोबबलमध्येही फारसा सराव करता आलेला नाही. त्यातच या स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी प्रत्येक संघाला केवळ एकच सामना मिळणार आहे. त्यामुळे या यात जे दोन संघ जास्त गुण मिळवतील त्याच संघांत अंतिम लढत रंगणार आहे.
यंदा या महिला आयपीएल स्पर्धेचे तिसरे वर्ष असून गेली दोन वर्षे सुपरनोव्हाज संघाने विजेतेपद मिळवले असून यंदा त्यांना विजेतेपदाची हॅटट्रिक साकार करण्याची संधी आहे. यंदाची ही स्पर्धा भारतीय खेळाडूंसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. करोनामुळे लांबलेल्या काही स्पर्धा पुढील काळात सातत्याने आयोजित केल्या जाणार असल्याने या स्पर्धेतील कामगिरी त्यांना आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. मानधना, दीप्ती शर्मा, हरमनप्रीत कौर, जेमीमा रॉड्रीग्ज, शेफाली वर्मा या खेळाडूंचा खेळ या स्पर्धेचे सर्वात लक्षवेधी ठरणार आहे.
ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची माघार
या स्पर्धेत थायलंड, न्यूझीलंड, श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका या देशांच्या खेळाडू या स्पर्धेतील सहभागी संघाकडून खेळत आहेत. यातून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मात्र, माघार घेतली आहे. येत्या आठवड्यापासून ऑस्ट्रेलियात बीगबॅश टी-20 लीग सुरू होत असल्याने त्यांच्या खेळाडूंनी मिनी आयपीएल स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे.