पुणे : रस्त्याचं ‘दिवाळं’; बीआरटीचा ‘शिमगा’!

स्वारगेट-कात्रज मार्ग फेररचनेचे काम संथगतीने : “रेनबो बीआरटी’च्या धर्तीवर काम सुरूच

पुणे – शहरातील सर्वांत पहिला “बीआरटी’ अर्थात “बस रॅपिड ट्रान्झिट’ स्वारगेट ते कात्रज मार्ग संकटातून बाहेर येण्यास तयार नाही. पुणे-नगर रस्त्यावरील “रेनबो बीआरटी’च्या धर्तीवर या मार्गाच्या फेरचनेचे काम गेल्या तीन वर्षांपासून अजूनही सुरूच आहे. शिवाय त्याला तांत्रिक अडचणींचे ग्रहण लागले आहे. परिणामी, या मार्गावरील पीएमपीची बीआरटी सेवा पुढील वर्षी मार्च-एप्रिलदरम्यान सुरू होण्याची शक्‍यता आहे.

सातारा रस्त्यावरील “बीआरटी’ मार्गातील थांब्यांमध्ये स्वयंचलित दरवाजे नाहीत. इलेक्‍ट्रिकल यंत्रणाही कार्यान्वित झालेली नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून जरी बीआरटी मार्गाची फेररचना केली जात असली, तरीदेखील पुढील पाच-सहा महिने तरी हा मार्ग प्रवासासाठी बंदच राहणार आहे. या मार्गावर सध्या पीएमपी बसेस मुख्य रस्त्यावरूनच जात आहेत. त्यामुळे खासगी वाहनांची कोंडी होत आहे.

मार्चपर्यंत तरी बीआरटी मार्ग फेरचनेचे काम पूर्ण होणे अशक्‍य आहे. स्वारगेट व कात्रज येथील आगार आणि बसथांब्यांची कामेही अपूर्णच आहेत. ही कामे झाल्यानंतरच मार्ग सुरू करता येईल, अशी स्पष्ट भूमिका पीएमपी प्रशासनाने घेतली. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही जलद प्रवासासाठी प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षाच करावी लागणार आहे.

पीएमपीचे पालिकेला पत्र
सध्या स्वारगेट परिसरात मेट्रोच्या बहुउद्देशीय वाहतूक केंद्रासह (मल्टिमॉडेल ट्रान्सपोर्ट हब) भुयारी मार्ग आणि पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग करण्याचे काम सुरू आहे. ही कामे जोपर्यंत पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत स्वारगेटपासून बीआरटी बसेस धावू शकणार नाही. बीआरटी सुरू करण्यासाठी स्वारगेट येथील अतिक्रमणे हटवणे आवश्‍यक आहे. याबाबतचा पत्रव्यवहार पीएमपी प्रशासनाने महापालिकेला केला आहे.

बीआरटी सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने पीएमपीकडे बसेस आहेत. मात्र स्वारगेट, कात्रज बस स्थानकांसह विविध कामे अपूर्ण आहेत. त्याबाबत महापालिकेशी पत्रव्यवहार करण्यात आला असून पाहणी दौराही केला आहे.
– राजेंद्र जगताप, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमल 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.