वेल्हे – वेल्हे ग्रामीण रुग्णालयातील एका कर्मचाऱ्यास शनिवारी (दि. 25) करोना झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांची तपासणी केली असता त्यांचे अहवाल सोमवारी (दि. 27) निगेटिव्ह आल्याने वेल्हेकरांना थोडा दिलासा मिळा आहे. या चौघांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने तालुक्यातील संक्रमणाचा धोका तुर्तास तरी टळला आहे. असे असले तरी आणखी 15 दिवस या चौघांना विलगीकरण कक्षात ठेवले असून, त्यांच्यावर आरोग्य व महसूल विभागाकडून विशेष लक्ष ठेवले जात आहे.
वेल्हे तालुक्यातील सुरुवातीला सापडलेला करोना रुग्ण बरा झाल्याने तालुका करोनामुक्त झाला होता; परंतु काही दिवसांनी एकाच परिसरात 8 रुग्ण आढाळल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली होती. यावर प्रशासनाने मात करात आजूबाजूचा परिसर सील करून चेकपोस्ट बसवले. आरोग्य विभागाकडून नागरिकांची कसून तपासणी करण्याचे काम युद्ध पातळीवर केले गेले. याला काही दिवस उलटत नाहीत तर ग्रामीण रुग्णालयातील कर्मचाऱ्याला करोना लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने रुग्णालयात तपासणी करून गेलेल्या नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली होती.
-पानशेत परिसर केला सील
पानशेत परिसराततील 8, तर वेल्ह्यात 1 रुग्ण असे वेल्हे तालुक्यात एकूण नऊ करोनाबाधित रुग्ण आहेत. नवीन रुग्ण आढळलेल्या ठिकाणापासून 5 कि. मी.पर्यंतचा परिसर सील केला आहे. कोंढावळे खुर्द, कोंढावळे बुद्रुक, धानेप, हिरपोडी, भट्टीवाग, ब्राह्मणघर, खोडद, वेल्हे बुद्रुक, वेल्हे खुर्द आदी गावे भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी बफर क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे.