इंद्रायणीनगर, दि. 7 – महापालिकेने पुणे-नाशिक महामार्गाच्या सेवा रस्त्यावर चांदणी चौक ते कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृह चौकापर्यंत नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. तरीदेखील बेशिस्तपणाने या फलकांखाली वाहने लावली जात आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांकडून या रस्त्यावर नो पार्किंगची अंमलबजावणी कधी होईल असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
आळंदी रस्त्यावर सम, विषम पार्किंगचे नियोजन केले होते. मात्र, या नियोजनाचे पालन केले जात नसल्याचे निदर्शनास आले. सध्या महापालिकेद्वारे अर्बन सिटी अंतर्गत पुणे-नाशिक सेवा रस्त्याच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे. या अंतर्गत सेवा रस्त्यावरील अतिक्रमण केलेल्या फळ विक्रेत्यांचे पुनर्वसन राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली करण्यात आले आहे. सेवा रस्त्यावर नो पार्किंगच्या फलकाकडे दुर्लक्ष करीत विक्रेते हातगाड्याही लावत आहेत. त्यामुळे महापालिकेने लावलेल्या नो पार्किंग फलकाचे हसे होत आहे. पुणे-नाशिक सेवा रस्त्यावर पार्किंग नो पार्किंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने भोसरीतील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली पार्किंगचे नियोजन केले आहे. उड्डाणपुलाखालील ही पार्किंगची व्यवस्था सुरू झाल्यानंतर सेवा रस्त्यावरील नो पार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यात येईल.
– दीपक साळुंके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भोसरी.