परिंचे (वार्ताहर) : श्री क्षेत्र वीर येथे श्री नाथ मस्कोबा महाराजांच्या यात्रेचा मुख्य दिवस मारामारी ने (रंगाची शिंपण) करत दहा दिवस सुरू असलेल्या यात्रेची सांगता करण्यात आली. महाराष्ट्रातून लाखो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. यावेळी मंदिरात सवाई सर्जाचा जयघोष सुरू असताना हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली.
पहाटे श्रीनाथ म्हस्कोबा व देवी जोगेश्वरी यांच्या मूर्तीची महापूजा करून अभिषेक घालण्यात आले. कोडीतची मानाची पालखी दुपारी बारा वाजता प्रथम देऊळवाड्यात आली त्यापाठोपाठ कनेरी, वाई, सोनवडी, भोडवेवाडी, कसबा पेठ (पुणे) या पालख्या व सोहळ्यातील वीस गावच्या वस्त्र धारण केलेल्या मानाच्या काट्या ढोल ताशा सह अबदागिरी, निशान, छत्री, दागिदार व सर्व मानकरी मंदिरातली मानाच्या पालखीने मंदिराला तीन प्रदक्षिणा पूर्ण केल्यानंतर देऊळ वाड्यातील दगडी कासवावर तात्याबा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे, दादा बुरुंगले यांनी भाकणूक (भविष्यवाणी) सांगण्यात आली . यावेळी पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना सव्वास सव्वाशेर मिळेल. पाणी चार खंडात पडणार असून शेतकरी राजा सुखी होणार असल्याचे सांगण्यात आले भाकणूकीत नंतर दुपारी दीड वाजता रंगाची शिंपण मानकरी भरत जमदाडे यांच्यामार्फत करण्यात आली.एक मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून सर्व पालख्या आपापल्या स्थळी गेल्या यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.
देवस्थानच्या वतीने यात्रे निमित्त भाविकांसाठी दर्शन रांगा, पिण्याचे स्वच्छ पाणी, परिसर स्वच्छता, मंदिर आकर्षक विद्युत रोषणाई, स्वयंसेवक आदी सुविधा पुरवण्यात आल्याचे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ यांनी सांगितले. यावेळी उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, सचिव तय्यब मुलाणी उपस्थित होते. पौर्णिमेला सुरू झालेल्या यात्रेला गुलाल-खोबरे, मिठाईवाले, कासार, खेळणी वाले, झोके मोठ्या प्रमाणात आली होती. ग्रामपंचायतीमार्फत सार्वजनिक शौचालय, सार्वजनिक पाणी पुरवठा, ग्रामस्वच्छता, दिवाबत्ती, आदी सुविधा पुरविण्यात आल्याची सरपंच माऊली वचकल यांनी सांगितले.
सासवड पोलिस स्टेशनच्या वतीने चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. १०० पोलिस कर्मचारी, ५० खाजगी सुरक्षा रक्षक,६० पोलिस मित्र तैनात करण्यात आले असल्याचे पोलीस निरीक्षक दगडु हाके यांनी सांगितले.