पुणे -नाट्य रसिकांसाठी पर्वणी असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराच्या 31व्या वासंतिक नाट्य महोत्सवाला 10 मे पासून सुरुवात होत असून, गाजलेल्या नाट्यकृतींचा नव्याने रसास्वाद घेता येणार आहे.
नाट्यक्षेत्रातील 128 वर्षांची अखंडित परंपरा असलेल्या भरत नाट्य संशोधन मंदिराने सामाजिक तसेच पारंपरिक, लोकप्रिय संगीत नाटकांचे दर्जेदार प्रयोग सादर केले आहेत. यंदाचा महोत्सव 10 ते 14 मे या कालावधीत सभागृहात सायंकाळी होत आहे, अशी माहिती भरत नाट्य संशोधन मंदिराचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, विश्वस्त रवींद्र खरे आणि कार्याध्यक्ष अभय जबडे यांनी दिली.
1 मे रोजी “संगीत शारदा’, 11 मे रोजी “हे बंध रेशमाचे’, 12 मे रोजी “संशय कल्लोळ, 13 मे रोजी “कट्यार काळजात घुसली’ आणि 14 मे रोजी “स्वर सम्राज्ञी’ या नाटकांचे प्रयोग होणार आहेत. नाटककार विद्याधर गोखले यांचे जन्म शताब्दी वर्ष सुरू असल्याने विशेषत्वाने त्यांच्या स्वर सम्राज्ञी या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. चारुदत्त आफळे, संजीव मेहेंदळे, ऋषिकेश बडवे, रवींद्र खरे, संजय डोळे, कविता मेहेंदळे, गौरी पाटील, भाग्यश्री देसाई यांच्यासह अनेक अनुभवी तसेच युवा कलाकारही सहभागी आहेत. सर्व नाटकांचे दिग्दर्शन रवींद्र खरे यांनी केले असून संजय गोगटे, राहुल गोळे, अभिजित जायदे, प्रसाद करंबेळकर साथसंगत करणार आहेत.