पुणे -मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून उन्हाळ्यानिमित्त विशेष ट्रेन चालवल्या जात आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही जादा ट्रेन धावणार आहेत. तर, दुसऱ्या बाजूला मराठवाड्यासाठी एकही विशेष ट्रेन न सोडण्याचा रेल्वेने आपला हटवादीपणा कायम ठेवला आहे.
यंदा उन्हाळी सुट्या सुरू होताच, उत्तर प्रदेश, बिहार यांसोबतच पश्चिम बंगालसाठी मध्य रेल्वेने विशेष ट्रेन सुरू केल्या आहेत. महिनाभर आधीच त्याची घोषणा करण्यात आली आहे. तर, मराठवाड्यासाठी एकही विशेष ट्रेन सोडण्याचे नियोजन झालेले नाही. मराठवाड्यातील जनतेच्या मागण्यांची नोंद रेल्वे प्रशासनाच्या दरबारी कोठेही नसते. दोन महिने आधी तिकिटाचे नियोजन करून “वेटिंग’चा फेरा माथी येतो. शिवाय, तिकीट काढूनही ते “कन्फर्म’ होईल, याची शाश्वती नसते.
मराठवाड्यासाठी अपुऱ्या ट्रेन्स
मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील हजारो नागरिक पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांत ये-जा करतात. बीडवगळता अन्य जिल्ह्यांत रेल्वेचे नेटवर्क आहे. सध्या नांदेड-पनवेल-नांदेड, नांदेड-पुणे-नांदेड आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-पुणे-लातूर-बिदर, पुणे-हैदराबाद, पुणे- अमरावती या नियमित ट्रेन्स वगळता उन्हाळी विशेष ट्रेन पुण्यातून सुरू करण्यात आलेली नाही. करोनापूर्वी कुर्ला-बिदर ही ट्रेन लातूरमार्गे धावायची. आता तीदेखील बंद आहे. तर, काही ट्रेन्स आठवड्यातून फक्त एक-दोन दिवस धावतात.
बोगी संख्या कमी
पूर्वी ट्रेन्सला आय.सी.एफ कोच असताना 22-24 बोगी जोडल्या जायच्या. पण, आता एल.एच.बी. कोच बसवताना बहुतांश ट्रेन्सच्या बोगींची संख्या कमी करण्यात आली असून, 16 ते 17 बोगीच जोडल्या जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नसून, पर्यायाने खासगी ट्रॅव्हल्सद्वारे असुक्षित आणि महागडा प्रवास करावा लागत आहे.
दिवाळीतही अशीच स्थिती…
पुण्यातून अन्य राज्यांकडे धावणाऱ्या ट्रेन्समध्ये प्रामुख्याने दानापूर (बिहार), गोरखपूर, वाराणसी (उत्तरप्रदेश), एर्नाकुलम (केरळ), मालदा (प.बंगाल) मार्गावर वारंवार विशेष ट्रेन धावतात. पण, मराठवाड्यासाठी एकही विशेष ट्रेनचे नियोजन केले जात नाही. हीच स्थिती दिवाळीच्या काळातही असते. त्यामुळे रेल्वे प्रशासन आपला हेकेखोरपणा कधी सोडणार, असा प्रश्न आहे.
मी नांदेड-पुणे-नांदेड रेल्वे प्रवासाचे नियोजन केले होते. नांदेडहून पुण्याचे तिकीट आर.ए.सी. मिळाले. पण, परतीच्या प्रवासाचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता कमी आहे. सध्या 130 वेटिंग आहे. – एक प्रवासी