पिंपरी – मोशी येथील आरक्षित जागेवर आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून सेन्टॉसा पार्क, सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यात येणार आहे. त्यामुळे समाविष्ट गावांचा कायापालट होणार असून स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक वसंत लोंढे
यांनी येथे केले.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, रासप, रयत क्रांती शेतकरी संघटना आणि शिवसंग्राम संघटना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ मोशी येथे आयोजित बैठकीत बोलत होते. यावेळी महापौर राहुल जाधव, माजी महापौर नितीन काळजे, माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे, नगरसेवक वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, नगरसेविका सारीका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, सुवर्णा बुर्डे, माजी नगरसेवक बबन बोराटे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, ज्येष्ठ नेते काळूराम सस्ते, प्रभाग स्वीकृत सदस्य सागर हिंगणे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना लोंढे म्हणाले की, आमदार महेश लांडगे यांनी मोशी येथे सिंगापूरच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क व्हावे, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा केला. राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी त्यास मान्यता दिली. या पार्कसाठी सुमारे 1500 ते 1600 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पर्यटन विभागाच्या माध्यमातून एक हजार कोटींचा निधी उपलब्ध केला जाणार आहे. उर्वरीत निधी पिंपरी चिंचवड महापालिका उभारणार आहे. तीन वर्षांत हे सफारी पार्क साकारणार आहे. महापालिका आणि पर्यटन विभाग (एमटीडीसी) यांच्या संयुक्त विद्यमाने सफारी पार्कचे काम करण्यात येणार आहे. शहरातील पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल. देशात हा प्रकल्प राबविणारे हे पहिले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख जगाच्या नकाशावर होणार असल्याचे लोंढे यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या मोशी, चिखली, चऱ्होली भागाचा विकास झपाट्याने होत आहे. आमदार महेश लांडगे यांनी विविध प्रकल्पांच्या माध्यमातून समाविष्ट गावांना संजीवनी देण्याचे व्हिजन ठेवले आहे. त्यादृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतले आहेत. या भागात विकासाची गंगा आल्याचेही लोंढे म्हणाले.
आमदार महेश लांडगे यांच्या प्रयत्नांना यश; स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होणार – मोशी येथील नियोजित सफारी पार्कच्या जागी पुणे महापालिकेचा कचरा डेपो करण्याचा घाट घातला गेला होता. आमदार महेश लांडगे यांनी कचरा डेपोला जागा देण्याचा डाव हाणून पाडला. त्या जागी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सफारी पार्क साकारण्यास शासनाने मान्यता दिल्याने मोशीकरांची पुण्याच्या संभाव्य कचऱ्यापासून सुटका झाली आहे.
– वसंत लोंढे, माजी नगरसेवक