रेडा – उजनी (ता. माढा, जि. सोलापुर) येथील शुभांगी उमेश मेटे (वय 26) यांच्यावर दोन दिवसांपासून खोकला व तापावर भिमानगर गावातील डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यात उपचारासाठी नेले, तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून इंदापुरातील पानबुडे हॉस्पिटल येथे उपचारासाठी आणले असता या विवाहितेचा मृत्यू झाला, अशी खबर उमेश हरिदास मेटे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिली आहे. मात्र, याच प्रकरणात संबंधीत रूग्णालयाची तोडफोड करण्यात आल्याने डॉक्टर असोसिएशनेने याचा निषेध करीत मंगहवारी (दि.13) बंद पुकारला आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, उमेश हरिदास मेटे हे माढाचे रहिवासी आहेत, त्यांच्या पत्नी शुभांगी मेटे या काही दिवसांपासून खोकला व तापाच्या आजारामुळे त्रस्त असल्याने त्यांना भिमानगर येथील डॉक्टर पवार यांच्या दवाखान्यात प्राथमिक औषध उपचार करून पुढील उपचारासाठी रविवारी (दि. 11) दुपारी साडेअकरा वाजता इंदापुरातील पाणबुडे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले. डॉक्टर अविनाश पानबुडे यांनी संबंधित पेशंटच्या पेशी कमी झाल्या आहेत, मी तुमचे पेशंट कव्हर करतो, असे सांगितले. त्यामुळे उमेश मेटे हे अकलूजला जाऊन पेशी घेऊन आले.
पेशी भरल्यानंतर पेशंट शुभांगी यांची तब्येत बिघडली, त्यामुळे उमेश मेटे यांनी यांनी पानबुडे डॉक्टरांना भ्रमणध्वनीवर बोलवले. परंतु, डॉक्टर आलेच नाहीत. सोमवारी (दि.12) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान शुभांगी यांची हालचाल बंद झाली. मेटे यांनी आरडाओरडा केल्यानंतर दहा ते पंधरा मिनिटानंतर डॉक्टर पाणबुडे तेथे आले. त्यानंतर पानबुडे यांनी तिला तपासून शुभांगी मयत झाल्याचे सांगितले.
इंदापुरात डॉक्टरांचा आज बंद
इंदापूर शहरातील डॉक्टर पानबुडे यांच्या अतिदक्षता विभाग व रिसेप्शन विभागाची मयताच्या नातेवाईकांनी तोडफोड करीत नुकसान केले. मेडिकल असोसिएशन इंदापूर ब्रांच मधील सर्व डॉक्टरांनी या घटनेचा जाहीर निषेध नोंदवला आहे. शहरातील डॉक्टर मंगळवारी (दि. 13) बंद पुकारणार आहेत. दवाखान्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात यशोदीप हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अविनाश पानबुडे म्हणाले की, वैद्यकीय सेवा देणारा कोणताही डॉक्टर रुग्ण दगावला जाईल, असे कृत्य करीत नसतो, हे नातेवाईकांनी ओळखणे गरजेचे आहे.