पूरग्रस्तांचा प्रश्न मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार

ना. रवींद्र वायकर : पूरग्रस्त पाटण कॉलनी, कुंभार व्यावसायिकांची भेट

कराड – पूर परिस्थितीमुळे गणेशमूर्ती बनवणाऱ्या कुंभार व्यवसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या संपूर्ण नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत. तसेच मुंबई येथे होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतही आपण कुंभार व्यावसायिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी, यासंदर्भात प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही गृहनिर्माण उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी दिली. पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी कराड येथे आले असता कुंभार समाज, व्यावसायिकांनी शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांना आपल्या नुकसान भरपाई व अन्य मागण्यांसंदर्भात निवेदन दिले. त्यावेळी त्यांनी नुकसानी संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मांडणार असल्याची ग्वाही दिली आहे.

यावेळी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे गटनेते नितिन बानुगडे-पाटील, शशिकांत हापसे, नितिन काशीद आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
तत्पूर्वी शिवसेनेच्या शिवसहाय्य दौऱ्यात त्यांनी येथील पाटण कॉलनीतील पूरग्रस्त कुटुंबीयांची भेट घेऊन संसार उपयोगी साहित्याचे वाटप व आरोग्य तपासणी केली. तसेच बालाजी सांस्कृतिक भवन परिसर व कुंभार समाजातील गणेशमूर्ती व्यावसायिकांच्या नुकसानीची, कोयना नदीच्या संरक्षक भिंतीची पाहणी केली.

राज्यमंत्री नितिन बानुगडे-पाटील म्हणाले, गणेशोत्सव जवळ आला आहे. परंतु, पुरामुळे गणेशमूर्तींचे मोठ्या प्रमाणात नुकसान असल्याने सर्वांना गणेशमूर्ती उपलब्ध होतील की नाही याबाबत शंका आहे. कुंभार समाजाने यात मोठी आर्थिक गुंतवणूक केली असल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत संबंधितांनी आपल्या मागण्या शासनाकडे सादर कराव्यात. त्याबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेऊन संबंधितांना नुकसान भरपाई देण्यात येईल.

यावेळी कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष बानगुडे-पाटील यांच्याकडे कुंभार समाजाने आपली जमीन टेंभू प्रकल्प बाधितांना देण्यात आले असून त्याचा अजूनही समाजाला कोणताही मोबदला देण्यात आलेला नाही. यावर पाटील यांनी कुंभार समाजाने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, त्याचा पाठपुरावा करून यासंदर्भात लवकर बैठक लावून कुंभार समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here