वाल्हे (पुणे) – राज्यातील ग्रामीण भागात करोनामुक्तीसाठी प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर करोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर करोनामुक्त व्हावे, यासाठी राज्यात करोनामुक्त गाव स्पर्धा घेण्यात येत आहे.
या अनुषंगाने वाल्हे गावानेही या स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यानुसार आज (दि. 15) कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस महर्षि वाल्मिकी विद्यालयात देण्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला जाधव, सरपंच अमोल खवले यांनी दिली.
संपूर्ण गाव करोनामुक्त होण्यासाठी, तसेच भविष्यात येणाऱ्या करोनाच्या तिसऱ्या लाटेपासून, वाल्हे व परिसरातील प्रत्येक नागरिकांना वाचविण्यासाठी गावातील 18 वर्षापुढील सर्वच नागरिकांचे लसीकरण करण्याच्या उद्देशाने, भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून, ग्रामपंचायत वाल्हे व प्राथमिक आरोग्य केंद्र वाल्हे यांच्या सहकार्यातून, मागील महिन्यातील 8 जुलै ते 10 जुलै या दरम्यान 18 वर्षापुढील गावातील 2300 नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा पहिला डोस देण्यात आला होता.
लसीकरणासाठी येणाऱ्या नागरिकांनी ऑनलाइन नोंदणी करावी. तसेच ज्यांना नोंदणी करणे शक्य नसेल, अशा नागरिकांनी पहिल्या डोसच्या लसीकरणा दरम्यान नोंदणी केलेला मोबाइल घेऊन यावे, असे आवाहन सरपंच अमोल खवले, पर्यवेक्षक राजेंद्र दळवी यांनी केले आहे.