निगडी – पिंपरी चिंचवड शहरामध्ये आरटीई अंतर्गत 172 शाळा आहेत. या शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील मुलांना प्रवेश दिला जातो. परंतु तब्बल 140 शाळांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यांमुळे शाळांना शुल्क मिळाले नाही. त्यामुळे कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या शाळांवर कारवाई करण्याची मागणी आम आदमी पार्टीचे प्रकाश हगवणे यांनी मागणी केली आहे.
हगवणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शाळांनी मुद्दामहून कागदपत्रांमध्ये त्रुटी निर्माण करायची व गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवायचे, असे धोरण अवलंबले असल्याची शंका आहे. त्यामुळे या संदर्भामध्ये महापालिका शिक्षण अधिकारी व शाळेचा प्रशासकीय विभाग यांची गांभीर्याने चौकशी झाली पाहिजे. जेणेकरून अशा मनमानी व बेशिस्त प्रशासनाला आळा बसेल.
ज्या 140 शाळांना शासनाकडून आरटीई शुल्क परतावा मिळाला नाही, त्यांच्या खात्यात शुल्क जमा झाले नाही अशा शाळांची नावे पत्रकाद्वारे जाहीर करावीत. ज्या शाळांमध्ये आरटीई अंतर्गत जागा भरल्या गेल्या नाहीत त्या शाळेच्या प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्यात यावी. तसेच ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळण्यासाठी अर्ज केले होते त्या विद्यार्थ्याकडून शुल्क घेण्यात येऊ नये, अशी मागणी आपचे शहर प्रवक्ते हगवणे यांनी केली आहे.