राज्यातील 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस 45 वर्षांवरील नागरिकांसाठी वापरणार – राजेश टोपे

मुंबई – राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण मोहिमेला गती दिली जात आहे. 45 वर्षांवरील लोकांसाठी केंद्र सरकारकडून लस मिळत आहे. मात्र केंद्र सरकारकडे लशींचा तुटवडा निर्माण झाल्याने 45 वर्षांवरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यास उशीर होत आहे. त्यामुळे 18 ते 44 वयोगटासाठी खरेदी केलेली लस काही कालावधीसाठी 45 वर्षांवरील गटातील व्यक्तींना देण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी दिली.

म्युकर मायकॉसिस या आजाराचे प्रमाणही राज्यात वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. या आजाराच्या उपचारांसाठी मोठा खर्च येत आहे. त्यामुळे महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ रुग्णांना देण्यात येणार आहे. मात्र ही योजना ज्या सरकारी रुग्णालयांत राबविली जाते त्या सर्वच रुग्णालयात या आजारावर उपचार करणे शक्य नाही. उपचारासाठी लागणारे औषध योजनेत बसत नसल्यास रुग्णालयाला हे औषध मोफत देण्याचे काम राज्य सरकार करेल, अशी घोषणा  टोपे यांनी केली.

तसेच या आजाराच्या उपचारासाठी अम्फोटेरिसिन-बी नावाच्या इंजेक्शनची गरज लागत असून हाफकिन संस्था 3 दिवसांत टेंडर काढून याच्या 1 लाख व्हायल्स तयार करणार आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने त्यावर मिळणाऱ्या इंजेक्शनच्या किंमतीवर नियंत्रण करणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय औषध मूल्य नियामक संस्थेकडे (NPPA) यासंदर्भात पत्र पाठवण्यात आले आहे, असे टोपे यांनी सांगितले. राज्यातील जनतेमध्ये या आजाराची जनजागृती करण्यासाठी आरोग्य विभागाने नियोजन केले आहे, अशी माहितीही आरोग्यमंत्र्यांनी दिली.

देशाचे ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यात इथेनॉल प्लांटमध्ये ऑक्सिजन तयार करण्यात यावा असे सुचवले होते. त्यानुसार पहिला यशस्वी प्रकल्प उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशीव शुगर लिमिटेड या कारखान्यात पूर्ण झाला. 4 मेट्रिक टन प्रतिदिन म्हणजेच सुमारे 300 सिलेंडर प्रतिदिन ऑक्सिजन तयार करण्याची क्षमता या कारखान्याची आहे. याप्रमाणे राज्य शासनाकडून राज्यात इतर ठिकाणी ऑक्सिजन तयार करण्याचे काम करण्यात येईल, असे मंत्री टोपे म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.