बारामती : बारामती शहर व तालुक्यातील लॉकडाऊन संपणार की वाढणार याकडे बारामतीकरांचे लक्ष लागले असतानाच आणखी 7 दिवस कडक लॉकडाऊन असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी जाहीर केले आहे.
लॉकडाउनच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कोरोणाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी 7 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. बारामती शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी सात दिवस लॉकडाऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याचे प्रांत अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. अत्यावश्यक सेवेसाठी होम डिलिव्हरीसाठी अनुमती देण्यात आली आहे.
7 दिवस नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत झाली असून, आणखी 7 दिवस हा लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांनी चर्चा केली. यामध्ये उपस्थित पदाधिकारी व व्यावसायिक उद्योजक यांच्या चर्चेनंतर लॉकडाऊन पुन्हा सात दिवसांनी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा मात्र घरोघरी पोहोच करण्यासाठी प्रशासनाने अनुमती दिली आहे. यामध्ये किराणा व भाजीपाला साहित्याचा समावेश आहे. दूध वितरण सकाळी 7 ते 9 दरम्यान होणार आहे. दवाखाने व मेडिकल वगळता इतर सर्व सेवा मागील लॉकडाऊन प्रमाणेच बंद राहतील.
आज येथील प्रशासकीय इमारतीमध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस अप्पर पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, तहसीलदार विजय पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी किरणराज यादव हे अधिकारी उपस्थित होते.