डेहराडून -उत्तराखंडमधील चंपावत विधानसभा मतदारसंघात मंगळवारी पोटनिवडणुकीसाठी सुमारे 64 टक्के मतदान झाले. त्यामुळे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्यासह चार उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (ईव्हीएम) बंद झाले. त्या पोटनिवडणुकीचा निकाल 3 जूनला जाहीर होईल.
उत्तराखंडमध्ये फेब्रुवारीत विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून भाजपने सत्ता राखली. मात्र, मुख्यमंत्री धामी खटीमा मतदारसंघात पराभूत झाले. त्या पराभवानंतरही भाजपने धामी यांच्या नेतृत्वावरच विश्वास दाखवत त्यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले. मात्र, आमदार नसल्याने त्यांना सहा महिन्यांत विधानसभेवर निवडून जाणे अनिवार्य बनले.
धामी यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपचे नेते कैलाश गहटोरी यांनी आमदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे चंपावत मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी धामी यांना पोटनिवडणुकीत विजय प्राप्त करणे अनिवार्य बनले आहे.
त्यांच्यापुढे प्रमुख आव्हान कॉंग्रेसच्या उमेदवार निर्मला गहटोरी यांचे असेल. त्याशिवाय, समाजवादी पक्षाने उमेदवार रिंगणात उतरवला आहे. एक अपक्ष उमेदवारही पोटनिवडणुकीत नशीब आजमावत आहे.