जालंधर – आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार सुशील रिंकू जालंधर लोकसभा जागेसाठी पोटनिवडणुकीत विजयी झाले आहेत. त्यांनी त्यांच्या जवळच्या प्रतिस्पर्धी कॉंग्रेसच्या उमेदवार करमजीत कौर चौधरी यांचा 58 हजार मतांनी पराभव केला. आम आदमी पार्टीचे (आप) उमेदवार सुशील रिंकू हे त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी आणि कॉंग्रेसच्या उमेदवार करमजीत कौर चौधरी यांच्यावर सातत्याने आघाडी राखून होते.
पंजाबमधील जालंधर ही जागा कॉंग्रेसच्या ताब्यात गेली अनेक वर्षे होती. यासह पंजाबमधून लोकसभेत आम आदमी पक्षाचे खाते पुन्हा उघडले आहे. यापूर्वी भगवंत मान हे एकमेव खासदार होते. जालंधरची जागा 1999 पासून कॉंग्रेसकडे होती.
जालंधरमधील कॉंग्रेसचे खासदार संतोखसिंग चौधरी यांचे यावर्षी जानेवारीत “भारत जोडो यात्रे” दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर सत्ताधारी आम आदमी पक्ष, प्रमुख विरोधी पक्ष कॉंग्रेस, शिरोमणी अकाली दल आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात चौरंगी लढत झाली. दलितबहुल जागेवर चारही राजकीय पक्ष एकमेकांशी हात अजमावण्यासाठी रिंगणात होते. मात्र सर्वांवर मात करत आम आदमी पक्षाने बाजी मारल्याने पक्षाध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे.