टोरांटो – कॅनडामध्ये हॅन्डगनच्या विक्रीवर बंदी घातली जाणार आहे. पंतप्रदान जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारने काल या संदर्भातील एक विधेयक मांडले आहे. या विधेयकानुसार हॅन्डगनची आयात, खरेदी आणि विक्रीवर बंदी घातली जाणार आहे.
हॅन्डगनच्या वैयक्तिक वापरावर नियंत्रण आणणे आणि बंदुकांचा सर्रास वाढणारा वापर रोखण्याच्या उद्देशानेच हे विधेयक आणले गेले आहे. लवकरच या विधेयकाचे कायद्यात रुपांतर होणार असल्याचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे. आता संपूर्ण कॅनडामध्ये हॅन्डगन आयात करणे, खरेदी करणे आणि विक्री करणे पूर्णपणे बेकायदेशीर असणार आहे, असेही ट्रुडो यांनी म्हटले आहे.
कॅनडाने यापूर्वीच 1,500 प्रकारच्या लष्करी स्वरुपाच्या शस्त्रांच्या बंदुकांवर बंदी घालण्याचे ठरवले आहे. याशिवाय ज्यांच्याकडे अशी शस्त्रे आहेत त्यांच्यासाठी अनिवार्यपणे शस्त्रे “बायबॅक’ करण्याची योजनाही आखली गेली आहे. या योजनेला या वर्षाच्या अखेरपासून सुरुवात होणार आहे. शस्त्रे असलेल्या व्यक्तींची पार्श्वभुमी तपासण्याच्या कामाला यापूर्वीच सुरुवात झाली आहे.
ट्रुडो यांनी खूप पूर्वीच शस्त्रांवर निर्बंध आणण्याची भूमिका मांडली होती. मात्र काही दिवसांपूर्वी अमेरिकेत टेक्सास, बफेलो आणि न्यूयॉर्क येथे सामुहिक गोळीबाराच्या घटना घडल्यानंतर या संदर्भातील विधेयक तातडीने आणले गेले आहे.