पाटणा – नितीश कुमार यांच्या संयुक्त जनता दलात अगोदरच कुरबुरी सुरू असताना आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंह यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे वाद उफाळून आला आहे. पक्षाच्या उत्तर प्रदेश शाखेने चार नेत्यांना पक्षात घेतले असून यातील एक जण हा उत्तर प्रदेशातील माफिया डॉन असल्यामुळे चांगलीच चर्चा रंगली आहे.
एवढेच नाही संबंधित माफियावर हत्या आणि लूटमारीचे डझनभर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे नितीश कुमारच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. धनंजय सिंह हे त्या डॉनचे नाव असून ते अगोदरच जनता दलाच्या तिकीटावर विधानसभेची निवडणूक लढले आहेत. माफिया डॉन अजित सिंह यांच्या हत्या प्रकरणात त्यांचे नाव समोर आले आहे.
तत्पूर्वी माफिया मुन्ना बजरंगी याच्या हत्येतही धनंजय यांचे नाव आले असून पोलिसांनी त्यांच्यावर 25 हजारांचा इनाम ठेवला आहे. विशेष म्हणजे फरारी आरोपी धनंजय सिंह यांच्यावर पोलिसांनी 25 हजाराचा इनाम ठेवला असताना ते एका क्रिकेट सामन्याचे उदघाटन करताना दिसून आले होते. त्यावेळीही बिहार सरकारवर जोरदार टीका झाली होती.