लखनौ – भारतासह देशभरामध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाने थैमान घातले आहे. भारतात आतापर्यंत कोरोनाचे २२३ रुग्ण आहेत. यांपैकी ३२ रुग्ण परदेशी नागरिक आहेत. सरकारतर्फे देशातील कोरोना व्हायरसच्या प्रसाराला आटोक्यात ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असून नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध उपाययोजना योजण्यात आल्या आहेत. देशावर कोरोनाचं संकट असताना देखील बॉलिवूडमधील प्रसिद्ध गायिका कनिका कपूरने बेजबाबदारपणाचा कळस केला आहे. कनिकाने जगभरात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु असतानाच मध्यंतरी लंडनवारी केली. भारतामध्ये परतल्यानंतर कनिकाने संबंधित अधिकाऱ्यांना आपल्या परदेशवारीबाबत माहिती देण्याचे कष्ट देखील घेतले नाहीत.
दरम्यान, कनिका आपल्या लखनौ येथील घरी परतल्यानंतर तिने एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीस हजेरी देखील लावली. अशातच आता कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून यामुळं कनिकाने हजेरी लावलेल्या पार्टीत सामील असलेल्यांचे धाबे दणाणले आहेत.
लखनौ येथील या पार्टीला भाजपच्या बड्या नेत्या वसुंधरा राजे व त्यांचा मुलगा हे देखील उपस्थित होते. आता या दोघांनीही विलगता पाळण्याचे ठरवले आहे. उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंग हे देखील या पार्टीला हजर असल्याने त्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला इतरांपासून विलग ठेवण्याचा निर्णय घेतलाय.
अशातच कोरोनाचा सामना करण्यासाठी सामान्य नागरिक सरकारद्वारे राबविण्यात येणाऱ्या उपाय योजनांना सकारात्मक प्रतिसाद देत असतानाच देशातील बडी सेलेब्रेटी मानल्या जाणाऱ्या कनिकाने अक्षम्य बेजबाबदारी दाखवल्याने सोशल मीडियामधून तिच्याविरोधात आवाज उठताना दिसत आहे.
Uttar Pradesh Health Minister Jai Pratap Singh self-isolates himself; he was in the party that was also attended by singer Kanika Kapoor who has tested positive for #Coronavirus. (File pic) pic.twitter.com/TrGo8BIP2t
— ANI UP (@ANINewsUP) March 20, 2020