न्यायालयातील चार आठवड्याच्या प्रकरणांना मिळणार पुढील तारखा

न्यायालयात गर्दी न करण्याचे आवाहन : एस.बी. आगरवाल

पुणे – वकील, पक्षकार न्यायालयात तारखा घेण्यासाठी गर्दी करत आहेत. या पार्श्‍वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी पुढील चार आठवड्याच्या प्रकरणांना तारखा देण्यात येणार आहेत. बोर्डावर लावून अथवा इतर प्रकारे पक्षकारांना या कळविण्याबाबत व्यवस्था करावी, असे परिपत्रक उच्च न्यायालयाचे रजिस्टर जनरल एस.बी. आगरवाल यांनी काढले आहे. पक्षकारांनी विनाकारण न्यायालयात येऊ नये, असे आवाहन पुणे बार असोसिएशनच्या वतीने करण्यात आलेले आहे.

याविषयी पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. सतिश मुळीक म्हणाले, 23 मार्चपासून कमीत कमी न्यायाधीश आणि कर्मचारी न्यायालयात यायला हवेत. केवळ जामीन आणि रिमांडची कामे होणार असून, दिवाणी प्रकरणामध्ये वकिलांनी सिध्द करावे की त्याचे काम अर्जंट आहे. सिध्द केले तरच त्या दाव्याची सुनावणी होईल. इतर न्यायाधीशांनी पुढील आदेश येईपर्यंत घरीच थांबायचे. एक महिन्याच्या तारखा द्यायच्या. बोर्ड प्रसिध्द करायचा. म्हणजे न्यायालयात गर्दी जमणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेले गर्दी टाळण्याचे आवाहन 100 टक्के आंमलात आणायचे आहे.

दरम्यान, न्यायालयाच्या आवारातील सर्व बार रुम, टेबलची जागा, ग्रंथालय आणि कॅंटीनही उद्यापासून (शनिवार, दि. 10) बंद राहणार आहेत. विनाकारण होणारी गर्दी टाळण्यासाठी ही उपाययोजना करण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष अ‍ॅड. सतिश मुळीक, उपाध्यक्ष अ‍ॅड. योगेश तुपे आणि अ‍ॅड. सचिन हिंगणेकर यांनी दिली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.