डिकसळ -गतवर्षी उजनी धरण 111 टक्के (123 टीएमसी) भरले होते. सध्या त्यातील पाण्याचा उपयुक्त साठा संपल्याने उजनीने तळ गाठला असून, धरणसाठा प्लसमधून मायनसमध्ये बुधवारी (दि. 13) आला आहे.
गतवर्षी उजनीचा पाणीसाठा मार्च महिन्यात मायनसमध्ये गेला होता. तर यंदा मे महिन्याच्या मध्यात झाला आहे. मागील वर्षी 15 मे रोजी उजनी धरण उणे 38 टक्के होते. तर पाणीसाठा 43.16 टीएमसी होता. त्या तुलनेत या वर्षी 15 मे रोजी धरणात अचल पाणीसाठा 63टीएमसी आहे. पावसाळा सुरू होईल इतपत समाधानकारक पाणीसाठा धरणात असल्याने सिंचनाचा व पाणीपुरवठ्याचा प्रश्न उद्भवणार नसला तरी सध्या मुख्य कालव्यातून 3200 क्यूसेक तर दहिगाव उपसा सिंचन 105 क्यूसेकने विसर्ग धरणातून सुरू आहे.
त्यामुळे पावसाळा सुरू होईपर्यंत आणखी किती पाणीसाठा खालावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उजनी धरणाच्या 123 टीएमसी पाणीसाठ्यापैकी 54 टीएमसी पाणी उपयुक्त तर 63 टीएमसी हा मृतसाठा धरला जातो. तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त पाणी आहे. उजनी धरण 100 टक्के भरते त्यावेळी 117 टीएमसी पाणी असते आणि 111 टक्के पाणी साठवले जाते त्यावेळी पाणीसाठा 123 टीएमसी होतो.
उजनी धरणातील पाण्यावर किमान 45 साखर कारखाने व दहा औद्योगिक वसाहती चालतात. सोलापूर शहरासह शेकडो गावांचा पाणीपुरवठा याच धरणाद्वारे होतो. हजारो हेक्टर शेतीला सिंचनाची सोयही होते. यामुळे उजनी धरणाला राजकीय, आर्थिक व सामाजिक क्षेत्रात अनन्य साधारण महत्त्व असल्याने जिल्ह्यासह राज्याचे लक्ष उजनीच्या पाण्यावर लागून असते.
सध्या उजनी धरणातील पाणीपातळी
एकूण पाणीपातळी – 490.990 दशलक्ष घनमीटर
एकूण क्षेत्रफळ – 196.81 चौ. कि. मी.
एकूण पाणीसाठा – 1794.93 दलघमी (63.38 टीएमसी )
उपयुक्त साठा – उणे 07.88 दलघमी (-0.28 टीएमसी)
टक्केवारी – उणे 0.52 टक्के
सुरू असलेला विसर्ग
मुख्य कालवा – 3200 क्यूसेक
भीमासीना बोगदा -640 क्यूसेक
उपसा सिंचन योजना-
सीना माढा – 220 क्यूसेक
दहीगाव – 105 क्यूसेक