नगर – करोना विषाणूचा संसर्ग शहरामध्ये वाढत चालल्यामुळे नगर शहरातील नागरिक भयभित झाले आहेत. सोलापूर रोड वरील शांतीनगर परिसरातील एक रूग्ण करोनाबाधीत आढळल्याने या भागातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाकडे शांतीनगर भाग हॉटस्पॉट जाहीर करावा अशी, मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली.
शांतीनगर परिसरातील एक रूग्ण करोनाबाधीत आढळल्याने या भागाची पहाणी आ. जगताप यांनी केली. यावेळी नगरसेवक गणेश भोसले, प्रकाश भागानगरे, अभियंता श्रीकांत निंबाळकर, गणेश गाडळकर आदी उपस्थित होते. यावेळी जगताप म्हणाले, शांतीनगर परिसरातील नागरिकांनी कोणीही घराबाहेर पडू नये. करोना संसर्ग विषाणूवर मात करण्यासाठी सोशल डिस्टींगचे पालन करावे. तसेच या परिसरात फवारणी करण्याचे आदेश दिले आहेत. सुरळीत पाणी पुरवठा ठेवण्याचे, तसेच दैनंदिन स्वच्छता ठेवावी व परिसर सॅनिटायझर करण्याच्या सुचना दिल्या.