नवी दिल्ली – करोनाच्या उपाययोजनांमध्ये सध्या सोशल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग सर्रास वापरला जात आहे. त्याऐवजी फिजिकल डिस्टन्सिंग हा शब्दप्रयोग वापरला जावा, अशी सूचना तृणमूल कॉंग्रेसचे नेते शांतनू सेन यांनी आज राज्यसभेत केली.
सामाजिक अंतर राखण्याचा शब्दप्रयोग चुकीचा असून त्यात कोविड रुग्णांवरही सामाजिक बहिष्कार घालण्याचेच वातावरण निर्माण होते. त्याऐवजी शारीरिक अंतर राखले गेले पाहिजे असे आवाहन करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
त्या सूचनेला अध्यक्ष व्यंकया नायडू यांनीही विधायक प्रतिसाद दिला. ते म्हणाले की, अशा बाबतीत आपण योग्य शब्दांचा वापर केला पाहिजे. शारीरिक अंतरापेक्षासुद्धा सुरक्षित अंतर हा शब्दप्रयोग अधिक उचित ठरेल, असे त्यांनी म्हटले आहे.
सोशल डिस्टन्सिंग शब्दप्रयोगाचा इतका व्यापक प्रमाणावर वापर झाला आहे की त्यामुळे करोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठीही अमानवी स्थिती समाजात निर्माण झालेली पाहायला मिळाली आहे, असे सेन यांनी म्हटले आहे.