Winter Session 2023 – संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये खासदारांचे घाऊक निलंबन करण्यात येत असल्याचं पाहायला मिळतंय. आज (गुरुवारी) देखील निलंबनाची कारवाई करण्यात आली असून ३ खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. आज निलंबित करण्यात आलेले खासदार लोकसभेचे असून नकुलनाथ, डीके सुरेश आणि दीपक बैज अशी त्यांची नावं आहेत. आजच्या (गुरुवार) तीन निलंबनांमुळे आता राज्यसभा व लोकसभेचे एकूण खासदार निलंबित झाले आहेत.
लोकसभेत मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त (नियुक्ती, सेवेच्या अटी आणि पदाचा कालावधी) विधेयक, २०२३ मंजूर करण्यात आले. यानंतर लागलीच विरोधी पक्षाच्या या तीन खासदारांवर निलंबनाची कारवाई करत त्यांना सभागृहातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
दरम्यान, विरोधी पक्षांनी आज एकत्र येत संसदेपासून विजय चौकापर्यंत मोर्चा काढला. खासदारांचे घाऊक निलंबन करणाऱ्या सरकारविरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली.
लोकसभेत घुसखोरी
संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अशातच संसदेची सुरक्षा व्यवस्था भेदत काही तरुण संसदेत घुसल्याची गंभीर घटना घडली होती. यावरून विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत साधनामध्ये येऊन वक्तव्य करावं, गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी लावून धरली होती.
ही मागणी केल्यामुळेच सरकारने सूडबुद्धीने निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप निलंबित खासदार करतायेत.
मोदींकडून संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन – खर्गे
निदर्शनादरम्यान काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये सुरक्षा उल्लंघनाच्या मुद्द्यावर न बोलून, संसदीय विशेषाधिकाराचे उल्लंघन केले आहे.
तसेच, खासदारांचे निलंबन आणि विरोधकांच्या अनुपस्थितीत महत्त्वाची विधेयके मंजूर झाल्यासंदर्भात बोलताना, सरकारला सभागृहात विरोधक नको आहेत, असे काँग्रेसचे खासदार कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे.