पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – सायबर चोरट्यांकडून काही दिवसांपासून आंतराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना (इंटरपोल) आणि सीबीआयच्या नावाचा वापर करुन फसवणूक केल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. मागील काही वर्षांपासून इंटरनेट सुविधेचा वापर करण्याचे प्रमाण वाढीले आहे
याच कारणातून इंटरनेटशी संबंधीत आमिषाने अनेकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
अगदी लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक इंटरनेटचा वापर करत आहेत. ऑनलाइन बँकिग, खरेदी-विक्री, खाद्यपदार्थ मागविणे, तसेच दैनंदिन वापरातील वस्तू ऑनलाइन पद्धतीने खरेदी केल्या जात आहेत. वीज देयक, मोबाइल देयक ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहे. समाजमाध्यमात अनोळखी व्यक्ती मैत्री करून आमिष दाखवितात. परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने अनेकांची फसवणूक करण्यात आली आहे.
उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या नावे समाजमाध्यमात खाते उघडून फसवणूक केली जाते. खासगी कंपन्याचे बनावट ईमेल पाठवून फसणूक केली जाते. इंटरपोल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो, कस्टम अशा विभागात अधिकारी असल्याची बतावणी केली जाते. कारवाईची भिती घालून पैसेही उकळले जातात.
नागरिकांनी फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तीशी मैत्री करु नये, तसेच त्यांनी दाखविलेल्या आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
सायबर फसवणुकीचे प्रकार काय ?
ऑनलाइन पद्धतीने शेअर बाजारात गुंतवणूक, ऑनलाइन टास्क, समाजमाध्यमात मैत्रीचे आमिष, विवाविषयक नोंदणी संकेतस्थळ, मधुमोहजाळात अडकवून फसवणूक (सेक्सटाॅर्शन), कर्ज मिळवून देण्याचे आमिष, बँक खाते अद्ययावत करणे,
वीज खंडीत करण्याची बतावणी, ऑनलाइन विमान, रेल्वे तिकिट आरक्षण असे फसवणुुकीचे प्रकार वाढीस लागले आहेत. शक्यतो ऑनलाइन खरेदी करताना प्रत्यक्ष भेटून पैसे द्यावेत. खरेदी केलेल्या वस्तुंची खातरजमा करण्यात यावी.
ऑनलाइन फसवणूक झाल्यास काय करावे ?
समाजमाध्यमात बदनामी, बनावट ई-मेलद्वारे फसवणूक तसेच ऑनलाइन फसवणूक झाल्यास नागरिकांनी त्वरीत जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात ([email protected], किंवा दूरध्वनी क्रमांक-०२०-२९७७१००९७, ७०५८७१९३७१) येथे संपर्क साधावा, तसेच १९३० या टोलफ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख यांनी केले आहे.