T20 World Cup 2024, Unmukt Chand : आयसीसी T20 विश्वचषक 2024 जवळ येत आहे, जो यूएसए आणि वेस्ट इंडिज संयुक्तपणे आयोजित करणार आहे. यूएसए क्रिकेटला त्याआधी आपली तयारी सुधारायची आहे, त्यामुळे नुकतीच बोर्डाने कॅनडासोबत टी-20 मालिकेची घोषणा केली आहे. यूएसए (USA) संघ 7 ते 13 एप्रिल दरम्यान कॅनडाच्या संघासोबत 5 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणार आहे. या मालिकेसाठी अलीकडेच 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला असून, त्यात माजी भारतीय क्रिकेटपटू उन्मुक्त चंदचा समावेश करण्यात आलेला नाही.
उन्मुक्त चंद हा तोच खेळाडू आहे जो 2010 आणि 2012 मध्ये झालेल्या अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये भारताकडून खेळला होता. आता उन्मुक्त चंदने कॅनडाविरुद्धच्या मालिकेसाठी निवड न झाल्याबद्दल X वर पोस्ट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
उन्मुक्त चंद नाराज…
यूएसए संघात निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत उन्मुक्त चंद याने X वर लिहिले आहे की, “हे जीवनातील सत्य आहे. मी अनेकदा लोकांना वाईट व्यवस्थेबद्दल तक्रार करताना आणि व्यवस्था सुधारण्याबद्दल बोलताना ऐकत असतो. पण जेव्हा असे लोक सत्तेवर येतात तेव्हा ते वाईट मार्गाने वागतात. पण, आता वेळ आली आहे की आपण स्वतःमध्ये बदल घडवून आणण्याची आणि जे योग्य आहे त्यासाठी, त्यासोबत उभे राहण्याची.”
Irony of life- I keep hearing people cribbing about unfair systems in place and the need for healthy changes but when the same people come to power, they practice the same unjust means too. It’s high time we bring the change within ourselves and stand firm for what’s right 🙏🙏
— Unmukt Chand (@UnmuktChand9) March 29, 2024
म्हणून घेतली होती भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती…
दरम्यान, उन्मुक्त चंदला भारतीय संघात खेळण्याची संधी मिळाली नाही, म्हणून त्याने भारतातील क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि ऑगस्ट 2021 मध्ये अमेरिकेत जाऊन स्थलांतरित झाला. चंदला आशा होती की, त्याला यूएसएसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळेल, परंतु आता 2024 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी कॅनडाविरुद्धच्या मालिकेतच त्याची निवड झालेली नाही.
उन्मुक्त चंदने त्याच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये मायनर क्रिकेट लीग (MILC) मध्ये सिएटल थंडरबॉल्ट्सला चॅम्पियन बनवले. कॅनडाविरुद्धच्या मालिकेत भारतीय वंशाचा मोनांक पटेल यूएसए संघाचे नेतृत्व करणार असून न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू कोरी अँडरसनलाही या संघात स्थान मिळाले आहे.