गझनी : अफगाणिस्तानच्या गझनी प्रांतातील याक जिल्ह्यात एका प्रवासी विमानाला अपघात झाला आहे. या विमानाने अफगाणिस्तानच्या हेरात विमानतळावरून उड्डाण घेतले होते. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास एरियाना अफगान एअरलाईन्सचे बोईंग विमान पूर्व गझनी प्रांतामध्ये कोसळले.
विमान कोसळले तो भाग तालिबानच्या नियंत्रणाखाली असून दुर्घटनेमध्ये किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, अपघातग्रस्त विमानात 110 प्रवासी असल्याती माहिती मिळत आहे. हे विमान पाडण्याची जबाबदारी तालिबानने स्वीकारली आहे.
गझनी प्रांतात अमेरिकन कब्जा असले एक विमान कोसळले आहे, असे तालिबानी प्रवक्त्या झाबीउल्लाह मुजाहिद यांनी पश्तो भाषेच्या निवेदनात म्हटले आहे. तथापि, एका आवृत्तीत असे सांगितले की विमान क्रॅश झाले तर दुसऱ्या आवृत्तीत असे सांगितले की बंडखोरांनी हे विमान पाडले आहे. त्यामुळे यातील सत्यस्थितीबाबत गोंधळ निर्माण झाला आहे.
अफगाण अधिकारी आणि विमान कंपनीने त्यांचे विमान बेपत्ता असल्याचे नाकारले आहे. तर नाटोने या दुर्घटनेबाबत अधिकृतपणे भाष्य केले नसल्यामुळे या घटनेभोवती गोंधळ सुरूच आहे.