वॉशिंग्टन : अण्वस्त्रसज्ज विमानवाहू नौका अमेरिकन नौदलाने सरावासाठी दक्षिण चीन समुद्रात दाखल केल्या आहेत. त्यामुळे भारताबरोबर लडाखमधील प्रत्यक्ष ताबारेषेवर संघर्षाच्या तयारीत असणाऱ्या चीनला आपले लक्ष अनेक आघाड्यांवर केंद्रीत करावे लागणार आहे. या नौकांनी लुझॉन स्ट्रेट ओलांडली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे या नौका दक्षिण चीन समुद्रात तैनात करण्यात येतील अशी अटकळ आहे.
या भागात चीनच्या पिपल्स लिबरेशन आर्मीने आणि चीनच्या नौदलाने अलीकडेच सराव केला होता. त्यावर शेजारी देश आणि अमेरिकेने आक्षेप नोंदवला होता. मुक्त आणि मोकळ्या इंडो पॅसिफिकला पाठिंबा देण्यासाठी या भागात सराव करत असल्याचे अमेरिकन नौदलाने म्हटले आहे.
या भागातील आमच्या सहकारी देशांना या विभागातील स्थैर्य आणि सुरक्षेसाठी आमची बांधिलकी दाखवण्यासाठी हा सराव केला जात आहे, असे रिअर ऍडमिरल जॉर्ज विकऑफ यांनी म्हटले आहे. ते वॉल स्ट्रिीट जर्नल या दैनिकाशी बोलत होते.
दक्षिण चीन समुद्रातून तीन अब्ज डॉलर्सच्या व्यापाराची ने आण होते. त्यातील 90 टक्के भागावर चीनने हक्क सांगितला आहे. गेल्या दशकभरात बिजिंगने येथे कृत्रिम बेटही तयार केले आहे. त्यावर लष्करी तळही उभारला आहे.
या भागातील ब्रुनेई, फिलिपाईन्स, तैवान आणि व्हिएतनाम यांनी दक्षिण चीन समुद्रावर दावा सांगितला आहे. आक्रमक चीन विरोधात 21 वादाचे प्रसंग निर्माण झाले आहेत. सर्वात मोठा पेच प्रसंग भारत चीन सीमेवर निर्माण झाला आहे. सुमारे दीड हजार किमी च्या सीमेवर भारतानेही आपले लष्कर सज्ज ठेवले आहे.