वॉशिंग्टन – अमेरिकेने चीनच्या विमान कंपन्यांच्या 44 विमानांच्या उड्डाणांना परवानगी नाकारली आहे. चीनने अमेरिकेच्या विमानांच्या उड्डाणांना परवानगी नाकारल्याला प्रत्युत्तर म्हणून आता अमेरिकेने हे पाऊल उचलले आहे. करोनाच्या निर्बंधांच्या आडून दोन्ही देशांमधील एकमेकांवर कुरघोडी करण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे.
अमेरिकेच्या हवाई वाहतूक विभागाने चीनच्या 4 विमान कंपन्याच्या विमानांच्या उड्डाणांना परवानगी नाकारली आहे. त्यापूर्वी चीननेही अमेरिकेच्या डेल्टा एअर लाईन्स, युनायटेड एअरलाईन्स आणि अमेरिकन एअरलाईन्स या कंपन्याच्या विमानांच्या उड्डाणांना चीनमधून प्रवासास परवानगी नाकारली होती. दोन्ही देशांच्या विमान कंपन्यांना एकमेकांच्या देशांमध्ये विमान प्रवास करण्यासंदर्भातील द्विपक्षीय कराराचा भंग चीनने केला असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. चीनच्या या कृतीला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनेही चीनच्या 44 विमानांच्या उड्डाणांना अमेरिकेत प्रवासाची परवानगी नाकारली आहे.
एअर चायना, चायना इस्टर्न एअरलाईन्स, चायना सदर्न एअरलाईन्स आणि शियानेन एअरलाईन्स या कंपन्यांच्या 44 विमानांना 30 जानेवारी ते 29 मार्च पर्यंत अमेरिकेत विमान उड्डाणास बंदी घालण्यात आली आहे.
दोन्ही देसांमधील विमान उड्डाणांच्या बंदीवरील ही कुरघोडी गेल्या वर्षी मार्चमध्ये करोनाची साथ सुरू झाली तेंव्हापासूनच सुरू झाली होती.