श्रीनगर – काश्मीरात शोपियॉं जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत आज एक दहशतवादी ठार झाला. हा दहशतवादी किलबाल भागात लपून बसला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागाची नाकेबंदी केली. त्यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला त्यावेळी ही चकमक झाली. त्याचे अन्यही काही साथीदार याच भागात लपून बसले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असल्याने त्या भागाची जवानांनी कसून तपासणी सुरू केली आहे.
ठार झालेल्या दहशतवाद्याची ओळख अजून पटलेली नाही. तो शेजारील देशातून आला असावा असा कयास आहे. त्याच्याकडे जे साहित्य सापडले आहे त्यातून त्याची ओळख पटू शकलेली नाही. दहशतवाद्यांच्या संबंधात मिळणाऱ्या माहितीवर सुरक्षा जवानांकडून तातडीने कारवाई सध्या केली जात असल्याने सध्या काश्मीरात मोठ्या प्रमाणात दहशतवादी मारले जात आहेत.