नवी दिल्ली – इराकमध्ये सक्रीय असलेल्या इराणचे समर्थन असलेल्या गटांवर अमेरिकेने हवाई हल्ले केले आहेत. कातिब, हिज्बुल्लाह आणि या गटांशी संबंधित तीन ठिकाणांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी आज बॉम्बफेक केली. इराकच्या उत्तरेकडील भागात अमेरिकेचे तीन अधिकारी एका ड्रोन हल्ल्यामध्ये जखमी झाल्यानंतर लगेचच हे हल्ले करण्यात आले. अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉइड ऑस्टिन यांनी आज ही माहिती दिली. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्या आदेशांनुसार हे हल्ले करण्यात आल्याचे ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
कातिब हिज्बुल्लाह ही इराणमधील बंडखोरांची संघटना इराकमध्ये सक्रीय आहे. इराण आणि सीरियामध्ये इस्लामिक स्टेटच्या विरोधात कार्यरत असलेल्या अमेरिकेच्या सैनिकांवर आज कातिब हिज्बुल्लाहने ड्रोन हल्ला केला.
त्यामध्ये तीन अधिकारी जखमी झाले. याची माहिती अध्यक्ष ज्यो बायडेन यांना कळवल्यानंतर त्यांनी लगेचच प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले. त्यानुसार या संघटनेशी संबंधित तीन ठिकाणांवर हल्ले केले गेले, असे ऑस्टिन यांनी म्हटले आहे.
हमासच्या दहशतवाद्यांना इराणकडून शस्त्रे आणि निधीचे सहाय्य केले जात असल्याचा आरोप अइमेरिकेने केला आहे. लाल समुद्रामध्ये व्यापारी जहाजांवर हल्ले करणाऱ्या येमेनच्या बंडखोरांनाही इराण मदत करत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. इराणचे हे उद्योग वाढल्यास त्याला प्रत्युत्तर दिले जाईल, असा अइशाराही अमेरिकेने दिला होता.