भारतालाही 2.9 दक्षलक्ष डॉलर्स
वॉशिंग्टन – अमेरिकेन करोना उपायांसाठी जगातील 64 देशांना 174 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्यात भारताचाही समावेश असून भारताला त्यांनी 2.9 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. अमेरिकेने गेल्या फेब्रुवारी महिन्यातच अशा प्रकारची 100 दशलक्ष डॉलर्सची मदत जाहीर केली होती त्या व्यतिरिक्त ही अतिरिक्त मदत असणार आहे. भारताला देण्यात आलेली मदत त्यांनी त्यांच्या देशात या संबंधातील प्रयोगशाळा सुरू कराव्यात, करोनाचे रूग्ण शोधून काढण्यासाठीच्या उपाययोजना कराव्यात आणि अन्य प्रकारची वैद्यकीय सज्जता ठेवावी यासाठी आहे.
अमेरिकेने गेल्या 20 वर्षात भारताला अशा प्रकारे एकूण 1.4 अब्ज डॉलर्सची वैद्यकीय मदत दिली आहे. अमेरिकेने संपुर्ण जगातील वैद्यकीय मदतीसाठी नेहमीच असा पुढाकार घेतला असून जागतिक आरोग्य क्षेत्रातील नेतृत्व अमेरिका करीत आहे, अशी माहिती अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय विकास संस्थेचे उपप्रशासक बॉनी ग्लिक यांनी दिली. सार्वजनिक आरोग्य सेवेच्या सुधारणेसाठी अमेरिका गेली अनेक दशके अशा प्रकारची मदत देत आहे असे त्यांनी नमूद केले. अमेरिकेच्या या मदत पॅकेज मधून श्रीलंकेला 1.3 दशलक्ष डॉलर्स, नेपाळला 3.4 दशलक्ष डॉलर्स, बांगलादेशला 3.4 दशलक्ष डॉलर्स, आणि अफगाणिस्तानला 5 दशलक्ष डॉलर्सची मदत देण्यात आली आहे.