न्युयॉर्क – करोनामुळे जगभरातील प्रवासी थंडावल्याने त्याचा मोठा फटका विमान कंपन्यांना बसला आहे. त्यामुळे अमेरिकेची युएस एअरलाईन्सही आर्थिक अडचणीत आली असून त्यांनी सरकारकडे विमान कंपनी तगवण्यासाठी 50 अब्ज डॉलर्सचे बेल आऊट पॅकेज मागितले आहे.
या कंपनीने करकपात, कर्ज आणि आर्थिक मदतीची गरजही व्यक्त केली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की करोनामुळे जगभगरातील जे सारे व्यवहार ठप्प झाले आहेत त्यातून अभूतपुर्व स्थिती उद्भवली असून विमान कंपन्यांच्या बाबतीत तर 9/11 च्या हल्ल्यात जितकी आर्थिक हानी झाली नाही त्याही पेक्षा मोठी हानी निर्माण झाली आहे.
विमान कंपन्यांना आत्ताच तातडीने मदत हवी आहे. संबंधीत विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा उद्याचा नव्हे तर आत्ताचा प्रॉब्लेम आहे. त्यावर त्वरीत आर्थिक उपाय योजल्याशिवाय गत्यंतर नाही. अमेरिकेतील विमान कंपन्यांचे सुमारे साडे सात लाख कर्मचारी आहेत. तथापी विमान उड्डाणेच रद्द झाल्याने या कर्मचाऱ्यांना पगार देण्यासह अनेक आर्थिक समस्या उद्भवल्या आहेत. लक्षावधी प्रवाशांची बुकिंग कॅन्सल झाली आहेत.
अमेरिकेतील अन्यही उद्योगांपुढे करोनामुळे मोठे आर्थिक संकट उद्भवले असून या कंपन्यांनी उत्पादन शुल्कात कपात करून आर्थिक मदतीचा हात सरकारने द्यावा अशी मागणी त्या सरकारकडे केली आहे.