बैरुत – सीरियाच्या पूर्व भागात इराणचे समर्थन असलेल्या गटांवर अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी जोरदार हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यांमध्ये किमान 19 जण ठार झाले आहेत, असे युद्ध निरीक्षकांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या हवाई हल्ल्यांमुळे इराण आणि सीरियातील इराणचे समर्थन असलेले गट सतर्क झाले आहेत. गुरुवारी इराणच्या कथित ड्रोन हल्ल्यात सीरियामध्ये अमेरिकेच्या एका कॉन्ट्रॅक्टरसह अन्य 6 जण ठार झाले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी अमेरिकेने या बंडखोरांवर हे हवाई हल्ले केले आहेत.
शुक्रवारच्या हवाई हल्ल्यानंतर पूर्व सीरियातील अमेरिकेच्या तळावर रॉकेट देखील डागण्यात आले होते. अमेरिकेच्या लडाऊ विमानांनी पूर्व सीरियातील आणि इराकच्या सीमेला लागून असलेल्या दर अल झोर प्रांतात तीन वेगवेगळ्या ठिकाणी बॉम्बफेक केली होती.
इराण आणि अमेरिकेने सीरियामध्ये अशाप्रकारे हवाई हल्ले यापूर्वीही केले होते. इराण धार्जिण्या गटांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी अमेरिकेच्या विमानांनी सीरियाच्या पूर्व भागांमध्ये यापूर्वीही हल्ले केले होते. सध्याच्या परिस्थितीमुळे इराण धार्जिण्या गटांकडून अमेरिकेच्या तळांवर आणखीन हल्ले केले जाऊ शकतात, अशी शक्यता “सिरीयन ऑब्जर्व्हेटरी फॉर ह्युमन राईटस’से प्रमुख रामी रामी अब्दुरहिम यांनी म्हटले आहे. सीरियामध्ये तैनात असलेल्या अमेरिकेच्या मनुष्यबळाला इजा पोचल्यासअमेरिका त्वरित आणि चोख प्रत्युत्तर देईल, असे अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी म्हटले आहे.