मोबाइलच्या गरजेचं रुपांतर व्यसनात कधी झालं हे आपल्याला कळलंच नाही. लहानांना त्याची सवय होऊ लागलीय आणि तरुण पिढीवर तर त्याचे थेट दुष्पपरिणाम दिसायला लागले आहेत. मोबाइलचा अतिवापर एका अभिनेत्रीला चांगलाच महागात पडले आहे. ही अभिनेत्री आहे “कसौटी जिंदगी की’ या प्रसिद्ध मालिकेत कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी ढोलकिया. मोबाइलच्या अतिवापरामुळे टेनिस एल्बो झाल्याचा खुलासा नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने केला आहे.
एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत उर्वशी म्हणाली, काही दिवसांपूर्वीच मला टेनिस एल्बो झाल्याचे निदान झाले आहे. मोबाइल फोनच्या अतिवापरामुळे मला टेनिस एल्बो झाला आहे. कारण माझं संपूर्ण काम आजकाल मोबाइलवरच सुरू असते. मला माझ्या शोचं संपूर्ण काम फोनवरच करावे लागत आहे. या शोचे सर्व एपिसोड मी स्वत: एडिट करत असते. त्यामुळे दिवसभर मला मोबाइल फोन पकडून काम करावे लागत आहे. याचाच हा दुष्परिणाम आहे, असे तिने सांगितले.
दरम्यान, देशभरात करोनामुळे लॉकडाऊन सुरू असल्याने सर्व चित्रपटांसह मालिकांचे शुटिंग रद्द करण्यात आले आहे. यामुळे सर्व कलाकार घरातच असून ते विविध माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत आहेत.