वाहनतळांची 30 लाखांची थकबाकी जमा
पुणे – महापालिकेची वाहनतळे चालवणाऱ्या ठेकेदारांवर कारवाईचा बडगा उभारताच थकबाकी भरण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या महिनाभरात थकबाकीपोटी पालिकेच्या तिजोरीत तब्बल 30 लाख रुपये जमा झाले आहेत. तर अजूनही ज्यांच्याकडे थकबाकी आहे, त्यांच्या पार्किंगला टाळे ठोकण्याची नोटीस प्रशासनाने बजावल्या आहेत.
शहरात महापालिकेची 26 वाहनतळे आहेत. ही सर्व ठेकेदारांना चालवण्यासाठी दिली आहेत. ही वाहनतळे अल्पदरात महापालिकेकडून मिळाल्यानंतर ठेकेदर सुरुवातीला काही महिने नियमित पैसे भरतात. त्यानंतर भाडे थकवण्यास सुरू होते. ठेकेदरांकडे महापालिकेची सुमारे दीड कोटी रुपयांची थकबाकी होती. मात्र, ती भरण्याकडे ठेकेदार कानाडोळा करत आहेत. त्यामुळे पालिकेने दीड महिन्यांपूर्वी मंडई येथील वाहनतळाला टाळे ठोकत ते ताब्यात घेतले.
त्यानंतर प्रशासनाने सर्वच ठेकेदारांना नोटीस बजावत ताबा काढून घेण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे धास्तावलेल्या ठेकेदारांनी थकबाकी भरण्यास सुरूवात केल्याचे मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे प्रमुख राजेंद्र मुठे यांनी सांगितले.