मेक इन इंडियावर भर : उत्सर्जन कपातीचे उद्दिष्ट
पुणे – जागतिक पातळीवरील दर्जेदार सायकलची भारतात निर्मिती व्हावी, सायकलची देशांतर्गत विक्री वाढण्याबरोबरच निर्यात वाढावी, यासाठी 23 सदस्यांची विकास परिषद निर्माण करण्यात आली आहे. अंतर्गत व्यापार आणि उद्योग प्रोत्साहन विभागाने यासाठी पुढाकार घेतला आहे. यात सायकलचे डिझाइन, अभियांत्रिकी, उत्पादन यामध्ये मूल्यवर्धित बाबींचा समावेश असावा, यासाठी ही परिषद काम करणार आहे.
इलेक्ट्रीक सायकल क्षेत्रातही ही परिषद काम करणार असल्याचे विभागाने सांगितले आहे. या परिषदेला कामकाजासाठी दोन वर्षांचा कालावधी दिला असला, तरी दरम्यानच्या काळात ही परिषद अंतरिम अहवाल देऊ शकणार आहे. या परिषदेत प्रोत्साहन विभागाशिवाय वाणिज्य मंत्रालय, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय, पर्यावरण, वातावरण बदल, आरोग्य, कुटुंब कल्याण, रस्ते वाहतूक, कौशल्य विकास आणि लघु उद्योग विभागात शिवाय भारतीय दर्जा मानांकन संस्थेचे अधिकारी सदस्य असणार आहेत.
त्याचबरोबर या परिषदेमध्ये या क्षेत्रातील 7 तज्ज्ञ असतील. सायकल वापर वाढावा, यासाठी सकारात्मक दृष्टिकोन तयार करणे आणि इतर बाबींवर हे परिषद लक्ष देणार आहे. या क्षेत्रातून निर्यात वाढण्यास मोठ्या प्रमाणात वाव आहे, त्याचबरोबर यासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञान भारताकडे उपलब्ध आहे, त्याचा वापर वाढावा या दृष्टिकोनातून ही परिषद पुढाकार घेईल.