श्रीगोंदा – येथील छत्रपती शिवाजी महाराज खरेदी-विक्री संघाच्या अध्यक्षपदी सुभाष मच्छिंद्र काळाणे यांची तर उपाध्यक्षपदी शरद शंकर जमदाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दरम्यान, वर्षानुवर्षे स्व. शिवाजीराव नागवडे यांचे वर्चस्व राहिलेल्या संघावर आता माजी आमदार राहुल जगताप यांनी राष्ट्रवादीचा झेंडा फडकवला आहे.
संघाच्या पदाधिकारी निवडीसाठी आज (दि.17) संचालक मंडळाची विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला नंदकुमार ताडे वगळता अन्य बारा संचालक उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी सुभाष काळाणे यांचा तर उपाध्यक्षपदासाठी शरद जमदाडे यांचा प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही निवड बिनविरोध पार पडल्याचे जाहीर केले.
राष्ट्रवादीकडे तेरापैकी आठ संचालक असल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड मानले जात होते. अध्यक्षपदावर राष्ट्रवादीत एकमत झाले होते. परंतु, उपाध्यक्षपदाच्या पक्षांतर्गत स्पर्धेतून राष्ट्रवादीत नाराजी उफाळून येण्याची शक्यताही वर्तवली जात होती. त्याअनुषंगाने विरोधी गटाकडून राष्ट्रवादीचे संचालक गळाला लावण्याचे प्रयत्न झालेही.मात्र, राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना अंतिमक्षणी “मुंबई’तून गडबड करू नका, असे फोन आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे संचालक फोडण्याच्या विरोधकांच्या मनसुब्यांवर पाणी फेरले.
त्यातच शिवसेनेचे संचालक नंदकुमार ताडे यांना “हायजॅक’ करण्याच्या माजी आमदार राहुल जगताप यांच्या खेळीने विरोधकांना आधीच झटका दिला होता. त्या धक्क्यातून विरोधक शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत. अंतिम क्षणापर्यंत प्रयत्न करूनही संख्याबळ जुळत नसल्याचे लक्षात आल्याने उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला.
दरम्यान, तालुका खरेदी-विक्री संघावर अपवाद वगळता स्व. शिवाजीराव नागवडे यांचेच वर्चस्व राहिले आहे. संघ आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते. आजच्या निवडीच्या निमित्ताने माजी आमदार राहुल जगताप यांनी संघावर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवून नागवडे गटाला धक्का दिला आहे.