मुंबई – ग्रेस हॅरिस, ताहिला मॅकग्रा व सोफी एक्केलस्टोन यांनी केलेल्या जबाबदार फलंदाजीच्या जोरावर यूपी वॉरियर्सने महिलांच्या आयपीएल स्पर्धेत गुजरात जायंट्सवर 3 गडी राखून मात केली.
गुजरात जायंट्सची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोफी डंक्ले व लॉरा वोलहार्ट यांनी 41 धावांची सलामी दिली. मात्र, या दोघी पाठोपाठ बाद झाल्या. त्यानंतर आलेल्या हरलीन देओलने साफ निराशा केली. त्यावेळी संघाची स्थिती 3 बाद 50 अशी होती. त्यानंतर मात्र, दयालन हेमलता व ऍश्ले गार्डनर यांनी संघाचा डाव सावरताना अफलातून फलंदाजी केली. या जोडीने चौथ्या गड्यासाठी 93 धावांची भागीदारी केली.
हेमलता 57 धावांवर बाद झाली. तीने या खेळीत 33 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व 3 षटकार फटकावले. दुसरीकडे गार्डनरनेही आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र, धावांचा वेग वाढवताना ती 60 धावांवर बाज झाली. या खेळीत तिने 39 चेंडूत 6 चौकार व 3 षटकार अशी फटकेबाजी केली. त्यानंतर त्यांच्या तळातील फलंदाजांनी निराशा केल्याने त्याना 20 षटकांत 6 बाद 178 धावापर्यंतच मजल मारता आली. यूपी वॉरियर्सकडून पार्शवी चोप्रा व राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
.@Sophecc19 ‘the finisher’ helps us seal a spot in the playoffs 😍#GGvUPW #UPWarriorzUttarDega #WPL pic.twitter.com/GljBwvox9E
— UP Warriorz (@UPWarriorz) March 20, 2023
विजयासाठी 179 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपीचा डाव एकवेळ 3 बाद 39 असा घसरला होता. त्यानंतर मात्र, ग्रेस हॅरिस व ताहिला मॅकग्रा यांनी गुजरातच्या गोलंदाजीवर आक्रमण केले. त्यांचा हाच दृष्टिकोन यशस्वी ठरला. ताहिला आक्रमक अर्धशतकी खेळी केल्यावर धावांचा वेग वाढवण्याच्या प्रयत्नात बाद झाली. तीने आपल्या 57 धावांच्या खेळीत 38 चेंडूत 11 चौकार फटकावले.
ग्रेसनेही अर्धशतकी पल्ला पार केला. त्यानंतर तिने सोफी एक्केलस्टोनसह संघाचे दीडशतक फलकावर लावले. विजयाची औपचारिकता बाकी असताना ग्रेस 72 धावांवर बाद झाली. तिने या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार व 4 षटकार फटकावले. ती बाद झाल्यावर एक्केलस्टोनने 13 चेंडूत नाबाद 19 धावा करताना 2 चौकार फटकावले. एकवेळ 6 चेंडूत 6 धावा तर 3 चेंडूत 3 धावा अशी रोमहर्षक स्थिती असताना सोफीने चौकार फटकावताना यूपी वॉरियर्सचा विजय साकार केला. गुजरातकडून किम गार्थने सर्वाधिक 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक –
गुजरात जायंट्स – 20 षटकांत 6 बाद 178 धावा. (ऍश्ले गार्डनर 60, दयालन हेमलता 57, सोफी डंक्ले 23, लॉरा वोलहार्ट 17, पार्शवी चोप्रा 2-29, राजेश्वरी गायकवाड 2-39). युपी वॉरियर्स – 19.5 षटकांत 7 बाद 181 धावा. (ग्रेस हॅरिस 72, ताहिला मॅकग्रा 57, सोफी एक्केलस्टोन नाबाद 19, किम गार्थ 2-29).