उंटाडे मारुती 350 वर्षांनंतर ‘मूळ रूपात’ प्रकटला!

मूर्तीवरील शेंदराचा दीड फूट जाडीचा लेप काढला

पुणे – शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या “उंटाडे मारुती’चे पुणेकरांना सुमारे 350 वर्षानंतर मूळ रुपात दर्शन होणार आहे. मागील अनेक वर्षांपासून मूर्तीवरील न काढलेले सुमारे 1 ते 1.5 फूट जाडीचे शेंदूर लेपन काढून मूळ मूर्तीवर नुकतेच वज्रलेपन करण्यात आले. या प्रक्रियेमुळे नागरिकांना मारुतीची मूळ देखणी मूर्ती पाहता येणार आहे.

रास्ता पेठेतील केईएम रुग्णालयाजवळील सुमारे 350 वर्षांहून जास्त पुरातन उंटाडे मारुती मंदिरातील मारुतीच्या मूर्तीवरील सुमारे 350 वर्षांपासून न काढलेले आणि सुमारे 1 ते 1.5 फूट जाडीचे शेंदूर लेपन नुकतेच काढले असून, नुकतेच या मूर्तीवर वज्रलेपन केले. प्रख्यात शिल्पकार अभिजित धोंडफळे यांनी हे काम केले. दरम्यान, या कामामुळे काळ्या पाषाणातील सुमारे 5 फूट उंच असणारी मारुतीची देखणी मूर्ती नागरिकांना पाहता येणार आहे.

शेंदूर काढल्यानंतर यातून सुमारे 7 पोती शेंदूर लेपन जमा झाले आहे. यामुळे काळ्या पाषाणातील देखणी, सुबक मूर्ती दिसत आहे. या मूर्तीचा मानवी चेहरा आहे. तर मारुतीच्या डोक्‍यावरील मुकूट कमलपुष्पाप्रमाणे आहे. उजवा हात आशीर्वादपर असून, डाव्या हातात गदा आहे. दोन्ही पायांमध्ये झोपलेला कली असल्याचे धोंडफळे यांनी सांगितले.

…असा आहे इतिहास
उंटाडे मारुती मंदिर हे रास्ता पेठेतील सुमारे 350 वर्षांहून अधिक पुरातन देवस्थान आहे. सरदार रास्ते हे पेशव्यांचे सेनाप्रमुख होते. त्यांच्याकडे येणाऱ्या व्यापाऱ्यांचे उंट येथे बांधले जात. त्यामुळे याला “उंटाडे मारुती’ असे नाव देण्यात आले. सन 1908 साली सरदार श्रीनिवास मुदलीयार यांनी त्यांची जागा केईएम हॉस्पिटलला दिली. त्याचबरोबर या देवस्थानाचा आणि मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा इतिहास आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.