कोरेगाव भीमा, (वार्ताहर)- कोरेगाव भीमा येथील हनुमान मंदिर समोरील बाजार मैदानात श्रीराम नवमीनिमित्त पुरोहित श्रीनिवास काका कर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली ११२ जोड्यांनी होमाला बसत भल्या पहाटेच श्रीराम नवमीची सुरुवात धार्मिक वातावरणाने केली.
कोरेगाव भीमा येथे श्रीराम नवमी ते हनुमान जयंतीपर्यंत श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रीक्षेत्र आळंदी येथील रामायणाचार्य हभप साध्वी वैष्णवी सरस्वती दीदी यांच्या सुश्राव्य वाणीने सादर होणाऱ्या कथेमध्ये पहिल्या दिवशी भागवत माहात्म्य, पांडव चरित्र आणि नारद चरित्र, दुसऱ्या दिवशी कपिल देवाहुती संवाद,
सती आणि ध्रुव चरित्र, तिसऱ्या दिवशी जडभरत कथा, नरसिंह अवतार, चौथ्या दिवशी गजेंद्र मोक्ष, वामन आणि राम अवतार चरित्र, कृष्ण जन्मोत्सव, पाचव्या दिवशी गोवर्धन पूजा, छप्पन भोग दर्शन, सहाव्या दिवशी रुक्मिणी स्वयंवर, सातव्या दिवशी सुदाम चरित्र कथा पूर्णाहुती तर आठव्या दिवशी काल्याच्या कीर्तनाने या रामकथेचे सांगता होणार आहे.