चिंता वाढली! बीडमध्ये महानुभाव आश्रमातील 29 साधकांना कोरोनाची लागण

बीड : बीडच्या गेवराई तालुक्यात एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तहसीलदार सचिन खाडे यांनी ही माहिती दिली. या प्रकारानंतर येवले वस्ती परिसर अनिश्चित कालावधीसाठी कंटेटमेंट झोन जाहीर करण्यात आला आहे.

गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावातील येवले वस्तीवर महानुभाव आश्रम आहे. या ठिकाणी गुरुवारी धार्मिक सोहळा होता. या सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली होती. शुक्रवारी येथील सुमारे ६० व्यक्तींची कोरोनासाठी अँटिजन चाचणी करण्यात आली. यात तब्ब्ल २९ व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत. एकाच आश्रमातील इतक्या मोठ्या प्रमाणावर व्यक्ती कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी सदर आश्रमास भेट दिली. कोरोना बाधितांना गृहविलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या आश्रमात गुरुवारी झालेल्या सोहळ्यास जिल्ह्यातील अनेकांनी हजेरी लावली होती. त्यामुळे ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी हजेरी लावली त्यांना जर काही कोरोनसदृश्य लक्षणे असतील तर त्यांनी स्वतःहून समोर येऊन तपासणी करून घ्यावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.