नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय हवामानतज्ज्ञांनी मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तर भारतीय हवामान खात्याने याच आठवड्यात चक्रीवादळाची शक्यता वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात 9 मेपर्यंत चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे . त्यामुळे मच्छीमारांनी या भागात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
चक्रीवादळ मध्य बंगाल उपसागराच्या दिशेने उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे. 6 मे रोजी बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून त्यानंतर चक्रीवादळ निर्माण होण्यास सुरुवात होण्याची चिन्हे आहेत. यामुळे आज विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे 2023 सालातील हे पहिले चक्रीवादळ आहे.
भारतीय हवामान विभागानुसार काही माॅडेल्समध्ये डिप्रेशनचे पुढे चक्रीवादळात निर्मिती होत असल्याचं दाखवत असल्याची माहिती आहे. बंगालच्या उपसागरात होत असलेल्या घडामोडींवर नजर ठेऊन असल्याची हवामान विभागाने ही महिती दिली आहे. ‘मोचा’ चक्रीवादळ बंगलादेशच्या किनारपट्टीला 11 ते 15 मे दरम्यान धडकण्याची शक्यता आहे.
हवामान खात्याने येत्या पाच दिवसांसाठी अलर्ट जारी केला आहे. भारतीय हवामान खात्यानुसार पुढील दोन दिवस वायव्य भारतात जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. तसेच मासेमारी करण्यासाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. हे चक्रीवादळ 40-50 किलोमीटर प्रति तास वेगाने वाहण्यचा अंदाज आहे.