पोलीस निष्क्रिय, केवळ 16 वाहनांचा शोध
पिंपरी – कडक लॉकडाऊनच्या काळात शहरातील गुन्ह्यांचा आलेख खूप खाली उतरला होता. परंतु “अनलॉक’ची प्रक्रिया सुरु होताच चोरट्यांनी सगळी कसर भरुन काढण्यास सुरुवात केली आहे. घरफोड्या, मोबाइल हिसकावणे आणि वाहनांच्या चोऱ्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. ट्रकपासून दुचाकीपर्यंत सर्व प्रकारची वाहने चोरटे पळवित आहेत.
गेल्या एकाच महिन्यात शहरातून 123 वाहनचोरीचे गुन्हे दाखल झाले आहेत. कमी-जास्त फरकाने आयुक्तालयाच्या सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे वाहनचोरांचा सुळसुळाट वाढला आहे.123 वाहने चोरीला गेलेली असताना पोलिसांना अवघ्या 16 वाहनांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. हे आकडे पोलिसांच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत.
आयुक्तालयाच्या हद्दीतून दररोज सरसरी चार ते पाच वाहने चोरीस जात आहेत. मागील महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातून तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. तर मागील नऊ महिन्यात शहरातून 627 वाहने चोरीला गेली असून त्यातील फक्त 95 वाहने पोलिसांना शोधली आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात संपूर्ण लॉकडाऊन असल्याने किरकोळ प्रकार वगळता शहरातील वाहन चोरी पूर्णपणे ठप्प झाली होती.
मात्र जून, जुलै आणि ऑगस्ट 2020 या तीन महिन्यांमध्ये 178 दुचाकी, 6 रिक्षा आणि 16 चारचाकी वाहने चोरीला गेल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी झाली. सप्टेंबर महिन्यात वाहन चोर मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याचे दिसून आले. सप्टेंबर महिन्यात तब्बल 123 वाहने चोरीला गेली आहेत. त्यामध्ये 108 दुचाकी, एक रिक्षा आणि 16 चारचाकी वाहनांचा समावेश आहे. चोरीला गेलेल्या केवळ 16 दुचाकी वाहनांचा शोध लागला आहे.
विशेष पथकाची गरज
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी “वाहन चोरी विरोधी पथक’ या विशेष पथकाची निर्मिती केली होती. या पथकात सात कर्मचारी आणि दोन पोलीस अधिकारी होते. मात्र, करोनाच्या काळात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी वाहन चोरी विरोधी पथकासह अन्य विशेष पथके माजी पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी बरखास्त केली. पिंपरी-चिंचवड शहर पोलिसांची मोठी व्याप्ती आणि त्या प्रमाणात अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला होता. वाहन चोरी विरोधी पथक तसेच गुन्हे शाखेने अनेक गुन्ह्यांचा उलगडा केला होता. शहरातून चोरलेली महागडी वाहनेही परराज्यातून जप्त केली होती. आता या पथकाची पुन्हा एकदा गरज असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
वाहनचोरांपुढे पोलीस हतबल
जानेवारी ते सप्टेंबर 2020 या नऊ महिन्यांच्या कालावधीत शहरातून 627 वाहने चोरीला गेली आहेत. लॉकडाऊनमुळे हे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत फार कमी आहे. गेल्यावर्षी जानेवारी ते सप्टेंबर 2019 या नऊ महिन्यांच्या कालावधीत पिंपरी-चिंचवड शहरातून एक हजार 20 वाहने चोरीला गेली होती. त्यातील 224 वाहनांचा शोध लागला होता. यावर्षी हा आकडा कमी जरी दिसत असला तरी कडक लॉकडाऊनचे दोन महिने पोलीस बंदोबस्त आणि सर्वच नागरिक घरी असल्याने चोरट्यांकडे कोणतीही संधी नव्हती.
मागील वर्षीच्या तुलनेत वाहनचोरीच्या घटना कमी दिसत असल्या तरी गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण मागील वर्षीच्या तुलनेत अतिशय कमी आहे. भर दिवसा देखील वाहने चोरली जात असल्याने वाहन चोरांसमोर पोलिसांची हतबलता स्पष्ट दिसून येत आहे. विशेष म्हणजे अनेक वाहने सोसायटीच्या पार्किंगमधून, घरासमोरुन चोरीला गेली आहेत. तर काही वाहने भर दिवसा रस्त्यावरुनही चोरल्याचे प्रकार घडले आहेत.