पुणे – कॅनरा बॅंकेच्या दोन एटीएममध्ये तांत्रीक छेडछाड करत तब्बल आठ लाखाची रोकड चोरण्यात आली. याप्रकरणी सहकारनगर आणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहकारनगर येथील एटीएममधून 5 लाख 66 हजार तर दत्तवाडी येथील एटीएममधून 2 लाख 46 हजार रुपये काढून नेण्यात आले आहेत.
सहकारनगर पोलीस ठाण्यात ऋषीराज सुभाष भोसले (34) यांनी बॅंकेच्यावतीने तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनूसार ते बॅंकेच्या धनकवडी शाखेमध्ये शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. बॅंकेचे चैतन्यनगर येथे भारती हॉस्पिटल शेजारी ओंकार चेंबरमध्ये एटीएम आहे. तेथे क्रेडीट कार्डच्या सहाय्याने पैसे काढण्याची प्रोसेस करुन एटीएममशीनचे अप्पर डिस्प्ले हुड काढृून मशिनची इंटरनेट केबल बंद-चालू करण्यात आली.
यानंतर रिसेट बटन दाबून झालेली ट्रांन्सजॅक्शन रेकॉर्डवर न येऊ देण्यासाठी मशिनमध्ये छेड छाड करण्यात आली. ही छेड छाड 26 ते 30 सप्टेंबर दरम्यान करण्यात आली होती. याप्रकरणी तीन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक बिडवई करत आहेत.
अशीच दुसरी घटना कॅनरा बॅंकेच्या सदाशिव पेठेतील विजयानगर येथील एटीएम सेंटरमध्ये घडली. वरिल प्रमाणेच एटीएम मशीनमध्ये छेडछाड करुन 10 व 12 ऑक्टोबर रोजी एटीएममधून 2 लाख 46 हजार रुपये काढण्यात आले. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात व्यक्तींविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. बॅंकेच्या वतीने आशुतोष उपाध्याय (33) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक माने करत आहेत.