सातारा, (प्रतिनिधी) – कराड येथील जुन्या कोयना नदीवरील पुलालगत दैत्य निवारणी मंदिराजवळ नदीपात्रात 23 फेब्रुवारीला 35 वर्षे वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळला होता. या व्यक्तीचा खून झाल्याचे स्पष्ट झाले होते. स्थानिक गुन्हे शाखा आणि कराड पोलिसांनी या खुनाचा उलगडा करून, शकील अन्वर शेख (वय 20, रा. दैत्य निवारणी मंदिराजवळ, कराड) आणि कृष्णा लक्ष्मण पुजारी (वय 24, रा. मुजावर कॉलनी, कराड) या संशयितांना जेरबंद केले आहे.
तो मृतदेह कर्नाटकमधील सेंट्रिंग व्यावसायिकाचा होता. आर्थिक देवाणघेवाणीतून, सिमेंटच्या पाइपने मारहाण करून, त्याचा खून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सातारा येथे शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
कराडचे पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, कराड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के. एन. पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर उपस्थित होते. समीर शेख म्हणाले, कराड येथे कोयना नदीपात्रात पाच फूट आठ इंच उंचीच्या पुरुषाचा मृतदेह 23 फेब्रुवारी रोजी आढळला होता. सिमेंटच्या पाइपला काळी दोरी बांधून हा मृतदेह नदीत टाकण्यात आला होता.
कराड पोलिसांनी स्केचद्वारे या मृतदेहाची ओळख पटवली. संबंधिताचा खून झाल्याचे स्पष्ट झाल्यावर, पोलिसांच्या पथकांनी कराड, मुंबई, पुणे, चिपळूण आणि कर्नाटकमध्ये तपास केला. कराड पोलिसांनी चार दिवसांत काही घटनांचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले असता, त्यामध्ये मृतदेहासंदर्भात महत्त्वाची माहिती हाती लागली. त्यानंतर पोलिसांनी शकील शेख आणि कृष्णा पुजारी यांना अटक केली. पैशांच्या कारणावरून सेंट्रिंग व्यावसायिकाचा खून केल्याची कबुली दोघांनी दिली आहे.
या गुन्ह्यात संशयितांनी आणखी एकाची मदत घेतली असून, त्याचा शोध सुरू आहे. या संशयितांना न्यायालयाने बुधवार, दि. 6 पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. हे संशयित पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार नाहीत. त्यांनी रागाच्या भरात या व्यावसायिकाचा खून केल्याचे शेख यांनी सांगितले. कराड पोलीस ठण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, संजय चोरगे,
सहाय्यक फौजदार रघुवीर देसाई, संजय देवकुळे, शशिकांत काळे, अमित पवार, कुलदीप कोळी, संतोष पाडळे, अमोल देशमुख, मुकेश मोरे, दिग्विजय सांडगे, महेश शिंदे, आनंद जाधव, सोनाली पिसाळ, सुनील माळी, स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सुधीर पाटील, रोहित फार्णे, अमित पाटील, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, नीलेश फडतरे, मयूर देशमुख, अविनाश चव्हाण, मोहन पवार, शिवाजी गुरव, मोहसीन मोमीन, पृथ्वीराज जाधव, अरुण पाटील, विशाल पवार, गणेश कापरे यांनी ही कारवाई केली.