प्रेमसंबंधातून खून : दोघांना अटक, भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई
पुणे – मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवीन बोगद्याअलीकडे गोणीत अनोळखी महिलेचा मृतदेह सापडला होता. या महिलेची ओळख पटली असून खुनाचा गुन्हाही 24 तासांत उघडकीस आला आहे. प्रेमसंबंधातून हा खून झाला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
दीपक रावसाहेब सुळके (25, रा. कापुरहोळ, ता.भोर) आणि धर्मेंद्र जांबुवंत तडसरे (38,रा. धायरी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर सुनिता बापू शेळके (40, रा. कर्वे रस्ता) असे मृत महिलेचे नाव आहे.
पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील यांच्या पथकाने मृत महिलेची प्रथम ओळख पटवली. ही महिला कर्वेरस्ता येथे राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. यानंतर तिचे दीपक सुळकेबरोबर प्रेमसंबंध असल्याची माहिती कर्मचारी प्रणव संकपाळ व हर्षल शिंदे यांना मिळाली. त्यानुसार दीपक याला कापुरहोळ येथे जाऊन अटक केली. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. त्याने त्याचा अल्पवयीन पुतण्या आणि धायरी येथे राहणारा मित्र धर्मेंद्र याच्या मदतीने तिचा मृतदेह गोणीत टाकून टाकून दिला होता. दोघेही आरोपी वाहनचालक आहेत.
याप्रकरणाचा तपास अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, उपायुक्त शिरीष सरदेशपांडे, बच्चनसिंग, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, सर्जेराव बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वसंत कुंवर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, पोलीस हवालदार भूषण कोते, कर्मचारी विनोद भंडलकर, श्रीधर पाटील, गणेश सुतार, प्रणव सकपाळ, हर्षल शिंदे, समीर बागसिराज, उज्ज्वल मोकाशी, प्रदीप शिंदे, मंगेश बोराडे, शिवा गायकवाड, जगदीश खेडकर यांच्या पथकाने केली.
पैशांचा तगादा लावल्याने खून
सुनिता आणि दीपक पूर्वी एकाच परिसरात वास्तव्यास होते. प्रेमसंबंधातून ती नेहमी दीपककडे पैसे मागायची.दि.14 जानेवारी रोजी दुपारी ती दीपकच्या कापुरहोळ येथील घरी पैसे मागण्यासाठी आली होती. त्याने पैसे देण्यास नकार दिल्यावर तिने आरडाओरडा केला. यामुळे कायमचा काटा काढण्याच्या उद्देशाने त्याने तिच्या छातीवर आणि तोंडावर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. ती बेशुद्ध पडून मृत झाल्याची खात्री पटल्यावर तिला गोणीत भरले. घटनेवेळी दीपकचे आई-वडील एका अंत्यविधीसाठी गेले होते. घरी फक्त अल्पवयीन पुतण्या होता. दीपकचे घर खोलगट भागात असल्याने ही घटना कोणाला माहिती झाली नाही.