उन्नाव बलात्कार पीडिता हरली जगण्याची लढाई

शुक्रवारी मध्यरात्री रूग्णालयात घेतला अखेरचा श्‍वास

नवी दिल्ली- उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे पाच जणांनी बलात्कार पीडित युवतीला गेल्या गुरूवारी जीवंत जाळले होते. या घटनेत 90 टक्के भाजलेल्या या युवतीचे काल मध्यरात्री अखेर दिल्लीच्या सफदरजंग रूग्णालात निधन झाले. या घटनेमुळे मोठाच जनक्षोभ उसळला आहे. विरोधकांनी यावरून उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ सरकारला घेरले असून समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यांनी या सरकारच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही योंगी सरकारवर कठोर शब्दात टीका केली आहे.

दरम्यान या प्रकाराबद्दल मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले असून या प्रकरणातील आरोपींवर फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान या प्रकरणात आरोपींना हैदराबाद सारखा न्याय दिला जावा अशी मागणी सदर युवतीच्या नातेवाईकांनी केली आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोन ज्येष्ठ मंत्र्यांना उन्नावला पीडित युवतीच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी धाडले आहे. त्यानुसार कमलरानी वरूण आणि स्वामी प्रसाद मौर्य हे मंत्री तिकडे रवाना झाले आहेत. या युवतीने काल रात्री सफदरजंग रूग्णयात 11 वाजून 40 मिनीटांनी अखेचा श्‍वास घेतला. ह्दयक्रिया बंद पडून तिचे निधन झाल्याची माहिती रूग्णालयाच्यावतीने देण्यात आली.

या मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला विमानाने दिल्लीला पाठवण्यात आले होते व दिल्लीत तिच्यासाठी स्वतंत्र आयसीयु स्थापन करून तिच्यावर उपचार सुरू होते. डॉक्‍टरांनी तिच्यावरील उपचारासाठी प्रयत्नांची शर्थ केली पण ते तिला वाचवण्यात अपयशी ठरले.

या मुलीच्या भावाने सांगितले की आम्ही तिच्यावर गावी नेऊन अत्यंसंस्कार करणार आहोत. आरोपींनी तिला आधीच जाळले आहे त्यामुळे आम्ही आता तिला आणखी न जाळता तिचा दफन विधी करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातील आरोपींना हैदराबाद पोलिसांनी तेथील आरोपींचा जसा न्याय केला तसाच न्याय केला जावा अशी मागणी तिच्या भावाने केली आहे.

आरोपी मेलेले मला पहायचे आहे त्यासाठी मला जगायचे आहे असे आपली बहीण सतत म्हणत होती अशी कहाणीही या भावाने सांगितली. मुलीच्या वडिलांनीही मारेकऱ्यांना हैदराबाद सारखाच न्याय मिळावा अशी मागणी केली आहे.

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी उन्नावला जाऊन पीडितेच्या कुटुंबियांचे भेट घेत त्यांचे सांत्वन केले आणि राज्य सरकारने तिला सुरक्षा न पुरवल्याबद्दल सरकारवर टीकेची झोड उठवली. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी राज्य सरकारच्या बेपर्वाईच्या विरोधात विधानभवनापुढे धरणे आंदोलन सुरू केले आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनीही योगी सरकारवर टीका करताना म्हटले आहे की महिलांवर अत्याचार झाला नाही असा एकही दिवस आज उत्तरप्रदेशात उगवत नाही.

या मुलीवर 12 डिसेंबर 2018 रोजी दोन जणांनी बलात्कार केला होता. या प्रकरणात मार्च महिन्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याची रायबरेली कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्या सुनावणीसाठी सदर मुलगी रेल्वेने तिकडे जाण्यासाठी निघाली असताना या प्रकरणातील आरोपींनी गेल्या गुरूवारी तिचे अपहरण करून तिला रॉकेल ओतून जीवंत जाळले होते. तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीपैकी शुभम त्रिवेदी याची गेल्याच आठवड्यात जामीनावर सुटका झाली होती.

त्यानेच आपल्या अन्य चार साथीदारांसह या मुलीला जीवंत जाळले होते. या पाचही आरोपींनी आता अटक करण्यात आली आहे. या मुलीवर दोन जणांनी डिसेंबर 2018 मध्ये बलात्कार केल्यानंतर प्रत्यक्ष गुन्हा दाखल करण्यास पोलिसांनी विलंब लावला आणि मार्च महिन्यात हा गुन्हा दाखल झाला. त्यानंतरही पोलिसांच्या मदतीमुळेच या आरोपीला जामीन मिळू शकला यामुळे पोलिसांच्या कारभारावरही टीका केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.