प्रशासनाचे दुर्लक्ष : संवेदनशील ठिकाणी होऊ शकते हेरगिरी
पिंपरी – सध्या लग्नसोहळा, वाढदिवस किंवा इतर खासगी कार्यक्रमांत ड्रोन कॅमेऱ्याच्या साहायाने फोटो व शुटिंग करण्याचा ट्रेंड वाढत आहे. हे ड्रोन कॅमेरे उडविताना व्यावसायिक शासकीय परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे. आकाशात विनापरवाना उडणाऱ्या ड्रोनमुळे शहरातील संवेदनशील ठिकाणांची हेरगिरी होऊन सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.
देशामध्ये ड्रोनच्या वापरावर कडक निर्बंध आहेत. ड्रोन किंवा ड्रोन कॅमेऱ्यांचा सर्वाधिक वापर हा सशस्त्र सेना, निमलष्करी दल, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती निवारण दलांकडून केला जातो. पोलिसांना ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर महसूल विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. शहरात मात्र गेल्या काही वर्षांमध्ये विनापरवाना खासगी कार्यक्रमांत सर्रास ड्रोन कॅमेरे उडताना दिसतात. शहरामध्ये देहू कॅन्टोन्मेंट व खडकी कॅन्टोन्मेंट सारखी लष्कराची महत्त्वपूर्ण ठिकाणे आहेत.
शहराला मोठा धार्मिक वारसा लाभलेला आहे. देहूसारख्या तीर्थस्थळावर नेहमीच भाविकांची गर्दी असते. या भागातही मोठ्या प्रमाणावर खासगी कार्यक्रमांसाठी ड्रोन कॅमेरे वापरले जातात. खासगी कार्यक्रमात ड्रोन कॅमेरा वापरायचा असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयातील गृहशाखेकडून परवानगी घ्यावी लागते. मोर्चासाठी अथवा आंदोलनासाठी, तसेच इतर शासकीय कार्यक्रमांसाठी ड्रोनबाबत परवानगी घेतली जाते. ड्रोनसाठी परवानगी घेताना पोलिसांनाही माहिती देणे आवश्यक असते. प्रत्यक्षात खासगी कार्यक्रमामध्ये ड्रोन वापरताना अशी परवागी घेतली जात नाही. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने धोका निर्माण होऊ शकतो. तसेच या कार्यक्रमात वापरलेल्या ड्रोनच्या नावाखाली संरक्षक ठिकाणांची हेरगिरी होऊ शकते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शहर परिसरात व इतरत्र ड्रोनद्वारे कार्यक्रमाचे फोटो, शुटिंग करणार असाल तर रीतसर परवानगी घेणे महत्त्वाचे आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव खासगी कार्यक्रमामध्ये असे कॅमेरे वापरणाऱ्यांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. मात्र अनेक व्यावसायिक परवानगी घेत नसल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने अशा प्रकारे विना परवाना ड्रोन कॅमेरे उडविणाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे.
असा होऊ शकतो गैरवापर
ड्रोन म्हणजे वैमानिकरहित छोटेखानी विमान. हेलिकॉप्टर अथवा इतर वाहने जिथे पोहचू शकत नाहीत तिथे ड्रोन सहज पोहचू शकते.
या ड्रोनला हाय डेफिनेशनचे कॅमेरे जोडता येतात. मोकळा परिसर, इमारत, धार्मिक ठिकाणे अथवा धरण आदी परिसरांचे या ड्रोनच्या माध्यमातून सहज फोटो व शुटिंग करता येते.
ड्रोनचा आकार लहान असतो. आवाजही कमी असतो. त्यामुळे या ड्रोनचा सहजरित्या कुणीही गैरवापर करू शकतात. तसेच लष्करी भागात याने हेरगिरी करणे सहज शक्य आहे. शहरात विनापरवाना उडणारे ड्रोनबाबत प्रशासन अद्यापपर्यंत तरी गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.