शेखर सिंह; नागठाणे प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ
नागठाणे (प्रतिनिधी) – पल्स पोलिओचे समूळ उच्चाटन करण्यासाठी शासन स्तरावरुन जोरदार प्रयत्न सुरु असून या मोहिमेत एकही बाल लसीकरणापासून वंचित राहू नये, असे आवाहन नूतन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ शेखर सिंह यांच्या हस्ते नागठाणे (ता.सातारा) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी सकाळी लहान बालकास पोलिओ डोस देऊन करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्ये, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमोल गडीकर, तहसीलदार आशा होळकर, जि. प.सदस्या भाग्यश्री मोहिते, पं. स.सदस्या बेबीताई जाधव, विजयाताई गुरव, आरसीएच अधिकारी प्रमोद शिर्के, सरपंच विष्णू साळुंखे आदी मान्यवर उपस्थित होते.
शेखर सिंह म्हणाले, सातारा जिल्ह्यामध्ये 2.42 लाख लाभार्थ्यांना 2457 पोलिओ लसीकरण केंद्रामार्फत डोस देण्यात येणार आहेत. यापैकी रेल्वेस्थानक, बसस्थानक,टोलनाके, मोबाइल बूथ, भटक्या वस्त्या, झोपडया, ऊसतोड मजुरांची पाले, वीटभट्टी, कामगार वसाहत व स्थलांतरित वस्त्या अश्या ठिकाणी असणाऱ्या प्रत्येक बालकांना हा डोस देण्यात येणार आहे.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आर.जे.कांबळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमास डॉ. पराग जोशी, डॉ.रविराज निकम, प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी, आशा,अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.